डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाला मनसेतर्फे १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र मुदत संपली तरी स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झाला नसल्याने मनसेतर्फे स्थानक परिसरात बुधवारी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी संपूर्ण स्थानक परिसराची पाहणी केली. आमदार येणार हे कळताच फेरीवाल्यांनी पळ काढला. अधिकाऱ्यांची मात्र आमदार पाटील यांनी फेरीवाल्यांकडून घेण्यात येणाऱ्या हप्त्यावरून चांगलीच खरडपट्टी काढली. ज्या पट्ट्यात फेरीवाले बसतात तिथे मीटर रिक्षाचा स्टँड सुरू करता येतो का, ते पहा असे त्यांनी रिक्षा चालकांना सांगितले.
न्यायालयाने स्थानक परिसरात १५० मीटर अंतरावर फेरीवाले बसू नये, असा आदेश काढला. मात्र न्यायालयाचा हा आदेश पायदळी तुडवत डोंबिवली स्थानकात फेरीवाले बसलेले दिसतात. त्यामुळे पुन्हा मनसेने स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा, यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. मात्र मुदत संपली तरी कोणताही बदल झाला नसल्याने आज आमदार पाटील कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. यावेळी रेल्वे पोलीस, वाहतूक पोलीस, विविध रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सहभागी झाले होते. यावेळी फेरीवाल्यांनी देखील आमदार पाटील यांची भेट घेत त्यांचे प्रश्न मांडले.
आमदार पाटील यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. यावेळी अधिकारी कारवाई करायला आल्यानंतर फेरीवाले ज्या ठिकाणी त्यांचे सामान लपवतात ती काही ठिकाणे रेल्वेच्या हद्दीत येतात. रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या सर्व रिकाम्या जागा बंद करा, असे निर्देश त्यांनी दिले.
तुम्ही कारवाई करत नाही, असा आरोप आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर केला. अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई करत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या याच उत्तरावरून कोण कोणाकडून किती हप्ते घेता ते माहीत आहे. खालपासून वरपर्यंत तुम्ही किती हप्ते घेता, या सगळ्यांची लिस्टच बाहेर काढेन, अशा पद्धतीने अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
आमदार पाटील येणार म्हणून फेरीवाले आज रस्त्यावर बसले नव्हते. मात्र त्यांनी आमदारांची भेट घेत आमच्या पोटा पाण्याचं काय करायचं? असा सवाल केला. यावर आमदार पाटील यांनी पालिकेचे फेरीवाला धोरण ठरविण्यासाठी फेरीवाल्यांसह आयुक्तांना भेटू, असे आश्वासन दिले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरला एक रस्ता खराब होतो म्हणून अधिका-याची तडकाफडकी बदली केली. पण आपल्या मतदारसंघात काय चाललंय, हे देखील पाहणे गरजेचे आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा या स्थानकाबाहेर काय परिस्थिती आहे हे पाहून त्यांनी अधिका-यांना झापले पाहिजे. ही टिका नाही तर माझा सल्ला आहे. सर्व पक्षांनी एकत्र बसून जर लक्ष दिले तर चित्र बदलून लोकांना चांगली सेवा मिळू शकते, असेही आमदार पाटील म्हणाले.
हेही वाचा :