हिंदुत्वाच्या कार्यक्रमातून राजकीय लाभ उठविण्याचा हेतू : एकनाथ खडसे | पुढारी

हिंदुत्वाच्या कार्यक्रमातून राजकीय लाभ उठविण्याचा हेतू : एकनाथ खडसे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एका विशिष्ठ पक्षाच्या किंवा गटाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विरोधात मोर्चे काढले जात आहेत. निवडणुकाजवळ येत आहेत, तसे जन आक्रोश मोर्चे, धर्माच्या संदर्भातील अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या मनात हिंदूत्व जागृत करणे आणि मतदार पेटीतून लाभ मिळवणे, हा राजकीय पक्षाचा हेतू असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता ते बोलत होते.

यावेळी खडसे म्‍हणाले, पक्षात फूट पडू नये. आणि असंतोष निर्माण होऊ नये, म्हणून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली. तर सरकार अस्थिर आहे. न्यायालयाचा काय निर्णय येतो, त्याच्यावर हे अवलंबून असून टांगती तलवार या सरकारवर आहे. त्यामुळे सामान्य माणूस या सरकारच्या विरोधात मतदान करेल, अशा प्रकारचा संकेत सर्व्हेच्या माध्यमातून आला आहे.सर्व्हे संदर्भात आलेल्या निकालावर भाष्य करताना त्यांनी हे सरकार सामान्यांचा विचार करत नसल्याचे नमूद करत सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याचे त्‍यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अथवा प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच सांगितले आहे. मात्र तसा प्रस्ताव आला तर पक्षातील वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील, असे खडसे यांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी आणि डॉक्युमेंटरीमध्ये माझ्या वडिलांचे नाव वापरू नका, हे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. बाळासाहेब हे त्यांचे वडील असल्याने उद्धव यांनी काय करावे. ते त्यांनी ठरवावे, याबाबत मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button