गावाच्या सुरक्षेसाठी तरुणच बनले रक्षक | पुढारी

गावाच्या सुरक्षेसाठी तरुणच बनले रक्षक

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा :  आपली सुरक्षा आपल्याच हाती या अभियानांतर्गत मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या मांडवी पोलिसांनी एक अनोखा प्रयोग राबविला असून पोलीस ठाण्यामार्फत प्रजासत्ताक दिनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक गावातून नियुक्त करण्यात आ लेले हे रक्षक आपापल्या गाव परिसरातील घटनांवर लक्ष ठेवून आपले गाव सुरक्षित कसे राहील याची काळजी घेऊन पोलिसांना साहाय्य करणार आहेत. मांडवी पोलीस स्टेशनला आता एक वर्षे पूर्ण होत असताना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गावातील सुरक्षा अधिक गतिमान व्हावी यासाठी मांडवी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ३२ गावात १०० सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनी स्थापन करण्यात आलेल्या या सुरक्षा रक्षकांना मांडवी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रफुल्ल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या १०० सुरक्षा रक्षकांना सूचना व सुरक्षा रक्षकांनी काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मांडवी पोलीस व गावांतील पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रांम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक दल सहाय्यक पोलीस निरीक्षक/बाबासो पाटील. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अंमलदार सुदेश कोरे, प्रशांत मोहळक, संभाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार आहे. चोरी, घरफोडी, व इतर घटनांसाठी तत्पर पोलीस सेवा मिळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या मांडवी पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून ग्रामस्थांनी मांडवी पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.

मीरा भायंदर पोलीस आयुक्तालयातील मांडवी पोलीस ठाण्याचे क्षेत्र हे मोठे असून बराचसा भाग हा दुर्गम आहे. यात पोलीस ठाण्याचे कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने खेड्यापाड्यात पोलीस लगेच पोहचु शकत नाहीत. म्हणूनच गावा- गावातील त्या क्षेत्राचे सुरक्षा रक्षक तयार करण्यात आले आहेत. या सुरक्षा रक्षकांना पोलीस काठी, शिटी, टीशर्ट व ओळखपत्र देण्यात आले आहे. ही संकल्पना चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ग्राम सुरक्षा रक्षक तैनातीवर आधारित असून लवकरच पोलिसांच्या खास प्रशिक्षणार्थ्यांकडून रक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

– प्रफुल वाघ, पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे.

Back to top button