रस्ताच नाही; इथे १० फूट उंच पाईपलाईनवरून खांद्याऐवजी अंत्ययात्रा नेतात हातावर | पुढारी

रस्ताच नाही; इथे १० फूट उंच पाईपलाईनवरून खांद्याऐवजी अंत्ययात्रा नेतात हातावर

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  रस्ता नसल्याने गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची अंत्ययात्रा १० फूट उंच असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील अरुंद रस्त्यातून गावकरी नेत असल्याचे धक्कादायक आणि तेवढेच भयाण वास्तव व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.

विशेष म्हणजे पाईपलाईनच्या त्या अरुंद रस्त्यावरून जाताना तिरडीवरील मृतदेह खाली पडून नये म्हणून दोनच गावकरी तिरडी हातात धरून जातात. हे भयाण वास्तव भिवंडी तालुक्यातील खालिंग खुर्द गावात असल्याचे समोर आले असून या गावातील बौद्ध स्मशानभूमी पाईपलाईनच्या पलीकडे असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाकडे मागणी अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

भिवंडी तालुक्यातून तानसा जल प्रकल्पच्या पाईपलाईनलगत असलेली बौध्द स्मशानभूमी व तसेच खालिंग खुर्द, गाव आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमुळे रस्ता नसल्याने गावकऱ्यांना एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्ययात्रा नेताना त्रास सहन करत मोठ्या जिकिरीने घेऊन जावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची विटंबना सतत होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या अडीअडचणी समजून उत्कर्ष मानव सेवा संस्थेच्या वतीने मुंबई महापालिका मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे रस्त्याच्या मागणीसाठी विनंतीअर्ज करण्यात आला. त्या अर्जात नमूद केले की, बौध्द स्मशानभूमी आणि शेतजमिनीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.

तक्रारींकडे मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष

स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उभारण्याची मागणी उत्कर्ष मानव सेवा संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून सतत अर्ज करीत आहेत. मात्र, मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची कुठली दखल घेतली नसल्याचा आरोप उत्कर्ष मानव सेवा संस्थाध्यक्ष धनंजय जाधवसह गावातील बौध्द वस्तीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे. एकंदरीत, एकीकडे ७५ व्या अमृतमहोत्सवी सरकारच्या वतीने मोठ्या उत्सवात देशभरात साजरा होत असतानाच खालिंग खुर्द गावात मरणानंतरही मरणयातना या बौद्ध वस्तीतील नागरिकांच्या नशिबी आल्याचे दिसून येत आहे.

Back to top button