डोंबिवली रेप केस : तब्बल ७२ तासानंतर मुलीला डिस्चार्ज | पुढारी

डोंबिवली रेप केस : तब्बल ७२ तासानंतर मुलीला डिस्चार्ज

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली रेप केस : डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीवर तब्बल 33 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने डोंबिवलीसह ठाणे जिल्हा हादरला. दरम्यान ७२ तासानंतर डोंबिवली येथे घडलेल्या प्रकरणातील पीडितेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या तीन दिवसांत ज्या चाचण्या करणे गरजेचे होते त्या चाचण्या करून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.

आरोपींची संख्या पाहता डोंबिवलीतील महाराष्ट्रातील सामूहिक बलात्काराची ही पहिलीच घटना मानली जाते. पोलिसांनी आतापर्यंत २९ जणांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. अटक आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. तर यातील अन्य ४ जण अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.

डोंबिवली रेप केस प्रकरण : पोलिसही काही वेळ निश:ब्द

सातत्याने होणाऱ्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या या मुलीने तिच्या घरच्यांसह बुधवारी रात्री मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि आपल्यावर सुरू असलेल्या अत्याचारांची कैफियत मांडली. या मुलीने स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा पाढाच वाचल्यानंतर पोलिसही काही वेळ निश:ब्द झाले होते.

मात्र पोलिसांनी धीर दिल्यानंतर या मुलीने सर्व माहिती कथन केली. 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर या 8 महिन्यांत बदमाश्यांनी आपल्याला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड आणि रबाळे परीसरात वेळोवेळी नेऊन अत्याचार तर केलेच, शिवाय शरीरसंबंधांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून हे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्याही दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

दोघा अल्पवयीन तरुणांचाही या कांडात सहभाग

ताब्यात घेतलेल्या २९ जणांपैकी दोघा अल्पवयीन तरुणांचाही या कांडात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

गुन्हा उघडकीस आणून पीडित मुलीस न्याय देण्याचा सर्वोतोपरी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अत्याचारकांडात आणखी ४ जणांचा समावेश असून त्यांनाही हुडकून काढण्यासाठी पोलिसांची पथके जंग जंग पछाडत आहेत.

विशेष म्हणजे या गंभीर अत्याचारकांडाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Back to top button