डोंबिवली : राष्ट्रवादीच्या ११ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश | पुढारी

डोंबिवली : राष्ट्रवादीच्या ११ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संघटनात्मक शक्तीवर विश्वास ठेवत बुधवारी (दि.४) डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सुमारे ११ पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून घेतले. जनतेची कामे करा, असे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

राष्ट्रवादीतील राहुल चौधरी, राजेंद्र नांदोस्कर, जगदीश ठाकूर, प्रशांत शिंदे, शैलेश गवळी, अर्जुन भाटी, देवा चुडनाईक, रतन चव्हाण, राजेंद्र चौधरी, रोहित चौधरी, अभिषेक खामकर, संजय पाटील, प्रदीप तेरसे, मधू शेळके, या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष भोईर, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, अभिजित सावंत, नरेंद्र म्हात्रे, राहुल भागात आदी उपस्थित होते.

याबाबत राहुल चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडीत असून संघटनात्मक शक्ती असलेल्या या पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आमची नाराजी नाही. दरम्यान, आपल्या पक्षातील पदाधिकारी दुसऱ्या पक्षाची वाट धरणार असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णयावर ठाम होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button