ठाणे : भिवंडीत गोवरचा प्रकोप; तब्बल ७९३ संशयित रुग्ण | पुढारी

ठाणे : भिवंडीत गोवरचा प्रकोप; तब्बल ७९३ संशयित रुग्ण

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  गोवर रुग्णांचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात पुन्हा एकदा गोवरबाधित रुग्णांचा प्रकोप वाढला आहे. तब्बल ७९३ संशयीत रुग्ण हे गोवर बाधित आढळून आल्याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामधील गोवर बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तब्बल ९२६ गोवर बाधितांचे नमुने तपासले असता त्यामध्ये ७९३ रुग्णांचे नमुने संशयित आढळून आले आहे. लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४८ वर गेली आहे. तर आता पर्यंत शहरात एकूण तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करीता हाफकीन रिसर्च इन्स्टीटयूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले होते. या अहवालात ४८ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत तर या अहवाला अंतर्गत फक्त १४ रुग्णांचे गोवर रुबेला लसीकरण झालेले आहे व इतर रुग्णांचे गोवर रुचेला लसीकरण झालेले नाही ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर रुग्ण बाधीत कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी घर- घरी जाऊन सर्वेक्षण करून संशयीत रुग्णांना व्हीटामिन
एचा पहिला डोस व २४ तासानंतर दूसरा डोस दिला जात आहे. तसेच नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील ज्या लाभाय्यांती गोवर रुबेलाचा डोस घेतलेला नाही अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेला डोस दिला जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी दिली आहे.

गोवर व रूबेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा त्यावर प्रभावीपणे मात करावयाची असल्याने शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना ताप किंवा अंगावर पुरळ आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रावर महानगरपालिकेने दिलेल्या मोफत औषधोपचाराचा फायदा घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Back to top button