ठाण्यात आठ कोटी रु. किमतीच्या बनावट नोटा ठाण्यात जप्त | पुढारी

ठाण्यात आठ कोटी रु. किमतीच्या बनावट नोटा ठाण्यात जप्त

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : दोन हजारांच्या नकली नोटांचे तब्बल 400 बंडल ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पथकाने शनिवारी जप्त केले. या नकली नोटा पालघर येथील एका कंपनीत छापण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

आठ कोटी रुपये किमतीच्या या नकली नोटा दोघांनी ठाण्यात विक्रीसाठी आणल्या होत्या. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राम हरी शर्मा (वय 52, रा. बोलिंज, विरार, जि. पालघर), राजेंद्र रघुनाथ राऊत (58, रा. कुरगाव, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी येथे बनावट नोटा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने गायमुख भागात सापळा लावून एक संशयास्पद इनोव्हा कार अडवली व त्यातील दोघांना ताब्यात घेतले. यावेळी कारमधून 2 हजार रुपयांचे तब्बल 400 बंडल पोलिसांना मिळून आले. आठ कोटी रुपये किमतीच्या या सर्व नोटा बनावट असल्याचे आढळले.

याप्रकरणी अधिक तपास केला असता, अटकेतल्या दोघांनी मदन चौहान (रा. पालघर) व इतर साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पालघर येथील कंपनीच्या कार्यालयात या नोटा छापल्या असल्याचे सांगितले. या सर्व नोटा ठाण्यात विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. पोलिसांनी नोटांचे बंडल व इनोव्हा कार जप्त केली असून, दोघांना अटक केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथील टेक इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कंपनीच्या कार्यालयातून नकली नोटा छापण्याचे साहित्य जप्त केले आहे.

Back to top button