ठाणे जिल्ह्यात आगीतून गुरे उडवण्याची प्रथा | पुढारी

ठाणे जिल्ह्यात आगीतून गुरे उडवण्याची प्रथा

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा :  शेतीप्रधान असलेला ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी समाज आपल्या सोबत राबत असलेल्या गुरा-ढोरांना पूर्वीपासूनच पूजनीय मानत आलेला आहे. दिवाळी येत असताना शेतीची सारे कामे
आटपलेली असतात. त्यानिमित्त आपल्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ढोरा उरवने ही प्रथा केली जाते. आगरी कोळी समाज असलेल्या प्रत्येक गावात हा उत्सव मोठ्या उत्साहात बलिप्रतिपदेच्या दिवशी साजरा करण्यात येत असतो.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना त्यांच्या मालकांकडून स्वच्छ धुतले जाते. गुरांची अतिरिक्त वाढलेली शिंगावरील टोके बोधट केली जातात जेणे करुन गुरांना याचा त्रास होणार नाही. त्यानंतर ती शिंगे विविध पद्धतीने रंगविली जातात. अंगावर योग्य अशा गेरुने पारंपरिक नक्षी काढली जाते. ज्यात हाताचे वर्तुळ आणि ठसे उमटवतात.

काही ठिकाणी त्यांना सजविल्यानंतर हळदी-कुंकूने पुजून गुरांना आगीवरून उडवण्याची ही शास्त्रोक्त पद्धत आहे ज्यात गुरांच्या आरोग्याची काळजी घेतांना ती सर्वतोपरी घेतली जाते. शेता-वनात असताना बर्‍याच वेळा गुरांच्या अंगाला पिसवा,गोचिड चिटकलेल्या असतात. म्हणून पेंढ्याची आग करून त्या वरून गुरांना उडवतात, ही आग
पेंढ्याची असल्याने सौम्य असते,लाकडा सारखे निखारे या आगीत नसतात. या शेकोटी वरून गुरांना उडवल्यावर
त्यांच्या अंगावरील जंतू धुरामुळे गळून पडतात नष्ट होतात. आगीचे भय गुरांना राहत नाही तसेच कधी यदाकदाचित रानात वणवा पेटल्यास गुरे सैरभैर होत नाहीत.

गुरांच्या पाठोपाठ घरातील मुलेही या आगीवरून मजेत उड्या मारतात. आगीशी काही सेकंदापुरताच संपर्क आल्यामुळे त्वचेला इजा संभवणे अशक्यच असते. शिवाय सोबत मोठी माणसे मदतीला सतर्क असतात. थंडिच्या दिवसात आगीवरून गुरे उडवून त्यांना उबदार शेक मिळवून देण्याची पारंपरीक पद्धत शास्त्रीय दृष्ट्या योग्यच आहे. परंतु अनेकांना ह्या प्रथेबद्दल योग्य माहिती नसल्याने कधी कधी प्रसार माध्यमात याबद्दल चुकीचे चित्र दाखविले जाते.

Back to top button