ठाणे : वरून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल : मनसे आमदाराचे महायुतीबद्दल सूचक विधान | पुढारी

ठाणे : वरून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल : मनसे आमदाराचे महायुतीबद्दल सूचक विधान

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : पक्ष प्रमुखांनी सांगितले युती करायची, ती देखील करायला आम्ही तयार आहोत. मात्र एक नक्की आहे की आमच्या सर्वांची मने जुळलेली आहेत, फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल, असे महायुतीबद्दल सूचक विधान मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यावेळी पत्रकारांशी बोलताना केले. या विधानांमुळे राजकीय गणितांच्या चर्चांना उधाण आले आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना महायुतीबाबत मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत एक लक्षवेधी विधान केले. आमची सर्वांची मने जुळली आहेत; फक्त वरतून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल, या आमदार पाटील यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी सोमवारी सकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणांची भेट घेऊन उपस्थित तरुणाईला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी आमदार पाटील यांनी डोंबिवलीचे प्रसिद्ध ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानलाही परिवारासमवेत भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या शहर शाखेत भेट दिली, यावर उपस्थित पत्रकारांनी छेडले असता आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राज्यात महायुतीच्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे रविवारी डोंबिवलीच्या फडके रोडवरील आप्पा दातार चौकात मनसेने दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता त्याच ठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा देखिल त्याच ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिल्यानंतर उपस्थित मनसैनिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राजकारणात विरोधात जरी असलो तरी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही. वैयक्तिक असे काही नसते. एकमेकाला चांगले शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळे असते, परंतु सगळ्या गोष्टी तश्या नसतात. युती करायची की नाही हे राज ठाकरे ठरवतील. निवडणुका स्वबळावर लढण्याच्या राज ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे.

Back to top button