ठाणे जिल्ह्यातील तीन आमदार भाजपच्या वाटेवर? | पुढारी

ठाणे जिल्ह्यातील तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचे केंद्र बनले असून आता तीन आमदार भारतीय जनता पक्षात दाखल होण्याची चिन्हे आहेत. भाजपमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर असलेले दोन आमदार कल्याण-डोंबिवलीतील, तर एक ठाण्यातील असल्याचे सांगितले जाते.

विधानसभेचे 18 आमदार, विधान परिषदेचे तीन आमदार आणि तीन खासदार असलेला ठाणे जिल्हा मोठा राजकीय जिल्हा समजला जातो. त्या जोरावरच मुख्यमंत्री शिंदे यांनी उठाव करीत राज्यात शिंदेशाही प्रस्थापित केली. मात्र, आता ठाण्यात पुन्हा पक्षांतर्गत गटबाजी सक्रिय झाली असून त्यातून एकमेकांचा पत्ता कट करण्याचे राजकारण शिजू लागले आहे. परिणामी वेळीच आपले हितशत्रू ओळखून काही आमदारांनी पक्षांतराचा मार्ग निवडल्याचे म्हटले जाते.

महाविकास आघाडी आणि युतीच्या लढाईत आपल्याला कुठे चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, याची चाचपणी त्या आमदारांनी सुरू केली आहे. पक्षांतर झाले तरच मंत्री होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, हे जवळपास निश्चित मानले जात असल्याने पक्षांतराचा ‘प्रताप’ घडवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या दोन गटातील भांडणामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आल्याने आमदारांसह नगरसेवकपदाचे इच्छुक उमेदवारही धास्तावलेले आहेत. दोन्ही शिवसेनांना स्वतंत्र चिन्हे मिळाली तर ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची अधिक संधी आहे, असेही या आमदारांचे मत बनल्यामुळे ते भाजपकडे निघाल्याचे सांगितले जाते.

Back to top button