ठाणे : रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडीतील जलचरांना धोका | पुढारी

ठाणे : रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडीतील जलचरांना धोका

सापाड; योगेश गोडे :  उल्हासनगर मधील प्रसिद्ध जीन्स कारखाण्यावर मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आली असून येथील जीन्स
कारखान्यांनी आपला मोर्चा कल्याण खाडी किनारी वळवला आहे. कल्याण खाडी किनार्‍यांवर झपाट्याने उभे राहत असणारे जीन्स कारखाण्याबाबत प्रदूषण मंडळ अधिकारी उदासीन आहेत. परिणामी जीन्स कारखानदारांचे चांगलेच फावले असून कारखान्याच्या मालकांचे चांगभलं सुरू आहे. जीन्स कारखान्यात कपड्याना रंग दिल्यानंतर हे कपडे नदीच्या पाण्यात धुतले जात असल्यामुळे खाडीच्या पाण्याचे प्रदूषण होते. तर जीन्स बनविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी बाहेर पडत असून नदीकाठी असलेल्या कंपन्यांमधून हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट खाडीपात्रात सोडले जात असल्यामुळे खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे.

लालसर, निळसर रंगाचे केमिकलयुक्त सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात असतानाही प्रदूषण मंडळाकडून याबाबत
कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना प्रदूषित सांडपाणीयुक्त पाणी प्यावे लागते. या कंपन्यांवर कारवाई करण्याची
मागणी असताना आता हे जीन्स माफिया कल्याण शहरात फोफावले आहेत. एकीकडे कल्याणच्या ग्रामीण भागातील रायते, कांबा,
वरप या नदीकाठावर जीन्स कारखान्यांनी बस्तान बसविल्यानंतर आता हे माफिया आता कल्याण खाडी किनारी पोहोचले आहेत.
नदी किनारी अनधिकृत कंपन्या थाटल्या गेल्या असतील तर त्याबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे सांगत
प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी कानाडोळा करत आहेत. जीन्स तयार केल्यानंतर उरलेले केमिकल रंगाचे
कपडे आणि इतर कचरा खाडीतील पाण्यात फेकला जात असल्याने खाडी प्रदूषणात वाढ होत असल्याने यावर कारवाई करण्यासाठी
प्रशासनाला न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, याबाबत प्रशासनाला विचारले असता खाडी किनारी जीन्स कंपन्या वाढत असल्याबाबत तक्रारच आली नसल्याचे सांगत आपण पाहणी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगरातील बहुतेक जीन्स कारखाने बंद

उल्हासनगर शहर हे गेल्या अनेक वर्षांपासून जीन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र कालांतराने जीन्स बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या केमिकलमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण निर्मिती होत असून त्याचा पर्यावरणावर विपरीत
परिणाम होत होता. उल्हासनगर महापालिका आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी यातील तांत्रिक अडचणी लक्षात घेता शहरातील बहुतेक जीन्स कारखाने बंद केले. त्यामुळे उल्हासनगर शहरातील बंद जीन्स कारखान्यांनी आपला मोर्चा कल्याण खाडी किनारी
वळविला आहे.

Back to top button