ठाणे : कल्याण-नगर महामार्गावरील गोवेली वर्तुळाकार रस्त्याने जोडणार | पुढारी

ठाणे : कल्याण-नगर महामार्गावरील गोवेली वर्तुळाकार रस्त्याने जोडणार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-डोंबिवलीमहानगरपालिका क्षेत्रातील 27 गावे, डोंबिवली, कल्याण ते टिटवाळा हा 20 किलोमीटरचा वर्तुळकार पद्धतीचा शहराबाहेरील रस्ता टिटवाळा येथे कल्याण-अहमदनगर महामार्गाला गोवेली (मुरबाड रस्ता) येथे जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

टिटवाळा ते मुरबाड रस्ता हा वर्तुळकार रस्त्याचा आठवा टप्पा असणार आहे. वर्तुळकार रस्त्याच्या या महत्वपूर्ण टप्प्यामुळे दुर्गाडी, डोंबिवली, भिवंडी भागातून येणारी वाहने कल्याण शहरातून न जाता वर्तुळकार रस्त्याने टिटवाळा येथून गोवेली दिशेने जाऊन तेथून मुरबाड, नगरकडे निघून जाणार आहेत. त्यामुळे कल्याण शहरातील शहाड उडडाण पूल, उल्हासनगर, वालधुनी भागातील रस्त्यांवर बाहेरुन येणार्‍या वाहनांचा ताण कमी होणार आहे.

टिटवाळा ते गोवेली रस्ते कामासाठी भूसंपादन प्रक्रिया, तसेच कामाचा सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू
करण्याचे आदेश एमएमआरडीएच्या बैठकीत देण्यात आले. 27 गावांतील हेदुटणे, काटई, भोपर, आयरे,
कोपर, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली, पत्रीपूल, दुर्गाडी, आधारवाडी, गांधारे, बारावे ते टिटवाळा असा 20 किमीचा वर्तुळकार रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याचे टिटवाळा ते गांधारे, दुर्गाडी ते गांधारे हे महत्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या रस्त्यांमध्ये काही बांधकामे असल्याने त्यांचे पुनर्वसन व मोबदला देण्याचा विषय प्रलंबित असल्याने हे टप्पे मार्गी लागले आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात केडीएमसीने डोंबिवली पश्चिमेकडे असलेल्या मोठागाव भागातील वर्तुळकार रस्त्याच्या कामासाठी या भागातील जवळपास 60 रस्तेबाधितांना हटविले. तिसर्‍या टप्प्यातील सुमारे 46 रस्ते बाधितांकडून जमीन हस्तांतरण होत नसल्याने काही जमिनी सरकारी व रेल्वेच्या असल्याने केडीएमसीला या टप्प्यातून 100 ट ?े भूसंपादन करता आले नाही.

भोपर-हेदुटणे भूसंपादनाचे काम रखडले

वर्तुळकार रस्त्याचा पहिला टप्पा हा 27 गावांतून हेदुटणे येथून सुरू होतो. हा रस्ता कोळे, काटई, भोपर येथून आयरे, कोपर, रेतीबंदर मोठागाव भागातून पुढे जातो. भोपर भागात गेल्या चार वर्षांपासून केडीएमसी आणि भूमीअभिलेख विभागाचे अधिकारी वर्तुळकार रस्त्याच्या सर्व्हेक्षण व भूसंपादन प्रक्रियेसाठी जात आहेत. भोपर भागात वर्तुळकार रस्त्याच्या मार्गात बेकायदा चाळी, बंगले, इमारती आहेत. त्यामुळे केडीएमसीचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात गेले तरी तेथे या भागातील रहिवासी आंदोलन करुन कर्मचार्‍यांना मोजणी वा सर्व्हेक्षणाला कडाडून विरोध करतात.  याविषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी मतपेटीला धोका नको म्हणून गुपचिळी धरुन आहेत

Back to top button