डोंबिवली : पुढारी इम्पॅक्ट-भोपर-देसलेपाडा गावच्या प्रवेशद्वाराचा रस्ता खुला झाला 25 दिवसांनी | पुढारी

डोंबिवली : पुढारी इम्पॅक्ट-भोपर-देसलेपाडा गावच्या प्रवेशद्वाराचा रस्ता खुला झाला 25 दिवसांनी

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथील भोपर-देसलेपाडा गावच्या प्रवेशद्वारावरची कमान उभारणीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. या कमानीसाठी भोपरच्या काही ग्रामस्थांनी रस्ता बंद केला होता. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरुन ये-जा करावी लागत होती. ही कमान काढण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला स्थानिक गुंड-गुन्हेगारांकडून दादागिरी केली जात असे. दैनिक पुढारीने “कमानीच्या बांधकामासाठी देसलेपाडा-भोपर रस्ता 25 दिवसांपासून बंद” प्रसारित करताच केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कमानीचे अडथळे दूर करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

भोपर गावात प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पालिका नगररचना विभागाची परवानगी घेऊन काम सुरू केले आहे. या कामासाठी कमानीचा रस्ता लाकडी वासे लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा रस्ता खुला करण्याची अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली होती. गावाला जोडणारा मुख्य रस्ताच बंद केल्याने नागरिकांची परवड झाली. सर्वांना रोटेक्स कंपनीच्या अरुंद, खड्डेमय रस्त्यावरुन येजा करावी लागत होती. त्यामुळे ज्येष्ठ, विद्यार्थी, नोकरदार यांचे सर्वाधिक हाल होत होते. कामाच्या ठिकाणी, शाळेत पोहोचण्यास मुलांना उशीर होत होता.

काही नागरिकांनी कमान बाजुला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना स्थानिक गुंडांनी धमक्या दिल्या होत्या. गुंड-गुन्हेगारांच्या दहशतीमुळे कमान काढण्यासाठी रहिवासी घाबरत होते. या भागातील काही जागरुक नागरिकांनी तक्रारी केली होती. याची गंभीर दखल घेत वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी कमानीच्या बांधकामाची पर्वा न करता बंद केलेला रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला. हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर खुला होताच या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सांगगाव, देसलेपाडा भागात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मुख्य रस्ता बंद असल्याने टँकरला वळसा घेऊन टंचाई भागात टँकर घेऊन जावे लागत होते. याविषयी स्थानिक कुणीही रहिवासी बोलला तर त्याचा आवाज स्थानिक गुंडांकडून दाबला जात होता. कमानीचा एक खांब कोणतीही परवानगी न घेता रस्त्या लगतच्या एका सोसायटीच्या आवारात उभारण्यात आला आहे. याविषयी सोसायटीचे चालक केडीएमसीसह महसूल विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सोसायटीतील  नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा  

वेल्हे : डिंगोरा पिटवूनही तोरणागड अंधारातच, महावितरण व पुरातत्व खात्याचा वेळकाढूपणा 

शेतमालाच्या दराची लपवाछपवी, संकेतस्थळावर आवक, दर प्रसिद्ध करण्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष 

पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, धानोरी जकात नाक्याजवळील घटना; पाच जणांविरोधात गुन्हा

Back to top button