कल्याण - डोंबिवलीत ८ हजार ८० घरगुती बाप्पांचे विसर्जन | पुढारी

कल्याण - डोंबिवलीत ८ हजार ८० घरगुती बाप्पांचे विसर्जन

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ जय घोषात सोमवारी कल्याण-डोंबिवली शहरातील सार्वजनिक 15 व खासगी 8 हजार 80 गणेशमूर्तीचे तर 3 हजार 467 गौरींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान निर्माल्यासाठी सर्वच ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे पर्यावरण पूरक वातावरणात गणपतीचे विसर्जन पार पडले.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यानजीकचा गणेश घाट, काळा तलाव, गौरी पाडा तलाव, आधारवाडी जेल तलाव तर डोंबिवलीमध्ये रेतीबंदर गणेश घाट, कुंभारखाण पाडा याच्यासह तलावात सार्वजनिक आणि घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन पार पडले.

घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचाही व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून गणरायाची भक्तिभावाने पुजा-अर्चा, भजन आणि कीर्तन यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी गौरी गणपतींना निरोप देण्यासाठी ढोल-ताशांचा गजर, बॅन्जो बॅन्ड आणि डिजे अशा तालावर लाडक्या बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक चौका चौकात आणि खाडी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button