ठाणे : अभिनेत्रीचा मोबाईल धूमस्टाईलने केला लंपास | पुढारी

ठाणे : अभिनेत्रीचा मोबाईल धूमस्टाईलने केला लंपास

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील अभिनेत्री शिवाली परब (23) हिचा अ‍ॅप्पल कंपनीचा महागडा आयफोन 13 हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

अभिनेत्री शिवाली परब ही कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इमारतीत राहते. शिवाली रविवारी सकाळच्या सुमारास मिरारोड येथे चित्रीकरणासाठी निघाली होती. त्यावेळी तिने उबेरची ऑनलाईन ऑटोरिक्षा बुक केली होती. रिक्षातून प्रवास करत असताना तिची रिक्षा कल्याण-भिवंडी मार्गावरील पिंपळास गावाच्या पुलाजवळ जवळ येताच, रिक्षाच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शिवालीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून धूम स्टाईलने दुचाकीवरून पळ काढला.

पोलीस पथकाने पिंपळास ते ठाणे-भिवंडीकडे जाणार्‍या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये दोघे दुचाकीवरून जाताना दिसून आले. आता पोलीसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. डी. घाडगे करीत आहेत.

Back to top button