ठाणे : राष्ट्रवादी - भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले (व्हिडिओ)

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण ग्रामीण भागात भोपर गावात अनेक वेळा राजकीय कारणावरून वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. मात्र, आज (दि.१७) सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी आणि भाजपचे कुंदन माळी हे जिममध्ये एकमेकांना भिडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेलेले दिसून येत आहेत. त्यातच कल्याण ग्रामीणमधील संदप भोपर हा पट्टा कायमच वादग्रस्त चर्चेत असतो. आता पुन्हा या ठिकाणी एक नवीन वाद समोर आला आहे.

आज सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे आपल्या जिममध्ये होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये गेले. जुन्या राजकीय वादातून कुंदन यांनी ब्रह्मा यांना मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. याअगोदर सुद्धा या परिसरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापलेले अनेकदा समोर आले आहे. अनेक प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत गेली आहेत. आता राज्यात सरकार बदल्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू असताना थेट जिममध्येच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Exit mobile version