ठाणे : ऐन हंगामात ग्रामीण भागात रासायनिक खतांचा तुटवडा | पुढारी

ठाणे : ऐन हंगामात ग्रामीण भागात रासायनिक खतांचा तुटवडा

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी भात पिकांची लागवड केल्यानंतर शेतीसाठी उपयुक्त असा पाऊस झाला आहे. मात्र आता भात पिकाला आवश्यक असणार्‍या खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद शेतकर्‍यांना मिळत नसल्याने खतांसाठी शेतकर्‍यांनी रायगड जिल्ह्याची वाट धरली आहे.

कल्याण, अंबरनाथ तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक फळभाज्या आणि भात पिकाची लागवड करण्यात येते. यंदा देखील पिकांची लागवड झाल्यानंतर श्रावण महिन्यात खताचा मारा हा पिकावर केला जातो. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून दुकानांमध्ये खतच उपलब्ध नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत. कल्याणसह अंबरनाथ तालुक्यातील शेतकर्‍यांनी खतासाठी आता रायगड जिल्ह्याची वाट धरली आहे. रायगड जिल्ह्यातील वावंजे परिसरातून खत घेऊन येण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे. सरकार शेतकर्‍यांना शेताच्या बांधावर खतांचा पुरवठा करण्याचे घोषित करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेताच्या बांधावर नाही मात्र दुकानांमध्ये देखील खत उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.

खतांसाठी शेतकरी रायगड जिल्ह्यात

भात पिकाची लागवड झाल्यानंतर पिके बहारत असून खत देण्याची आवश्यकता आहे. मात्र, ऐन हंगामातच शेतकर्‍यांना आवश्यक खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणी केलेली खते मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी रायगड जिल्ह्यात खतांसाठी भटकंती करत आहेत. ग्रामीण भागात तर काही ठिकाणी पंधरा दिवस पायपीट करूनही आवश्यक खते मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान यावर कृषी अधिकारी देखील कोणताही प्रतिसाद देत नसल्याने सर्व सामान्य सर्वच शेतकरी खतांसाठी रायगड जिल्ह्यात जाणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button