Kalyan crime : झोपलेल्या वॉचमनवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला | पुढारी

Kalyan crime : झोपलेल्या वॉचमनवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : Kalyan crime कल्याण पूर्वेकडील मलंग रोडला असलेल्या एका गॅरेजबाहेर झोपलेल्या वॉचमनवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. निलेश घोष (वय २५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या वॉचमनचे नाव आहे. त्याला उपचारासाठी त्याला मुंबईकडे हलविण्यात आले आहे. या जीवघेण्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कल्याण-मलंग गड रोडवरील एसआर पेट्रोल पंप समोरील एका गॅरेजच्या बाहेर वॉचमन निलेश हा रात्री तेथील लाकड्याचा बाकड्यावर झोपला होता. इतक्यात ३ ते ४ जण लाठ्या-काठ्यांसह तेथे आले.

हल्ला चढविण्याआधी एकाने निलेशच्या अंगावरील पांघरून हिसकावले. त्यानंतर मात्र तिघा-चौघांनी मिळून सोबत आणलेल्या लाठ्या-काठ्यांच्या साह्याने वॉचमन निलेशवर जोरदार हल्ला चढविला.

सगळ्यांनी मिळून डोके आणि पायांवर केलेल्या हल्ल्यात निलेश रक्ताच्या थारोळ्यात तडफडत बाकड्यावर पडला. त्याची हालचाल थांबली होती. निलेशची हालचाल बंद झाल्याने तो मृत्युमुखी पडला असावा, असा समज झाल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. हल्लेखोर निघून गेल्यानंतर जखमी निलेशने आकांत केला.

आसपासच्या रहिवाश्यांनी जखमी अवस्थेतील निलेशला उचलून हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मुंबईच्या सायन येथिल लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या प्रकरणी जखमी निलेशच्या जबानीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही सीसीटीव्ही कमेऱ्यांत कैद झाली आहे. या फुटेजच्या साह्याने निलेशवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

दरम्यान हा हल्ला आर्थिक, कौटुंबिक, पूर्ववैमनस्यातून वा अन्य कोणत्या कारणावरून झाला असावा, याचा शोध घेतला जात असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Back to top button