ठाण्याच्या बालेकिल्ल्यावर शिंदे यांची मजबूत पकड, संघटना टिकवण्याचे उद्धव, आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान | पुढारी

ठाण्याच्या बालेकिल्ल्यावर शिंदे यांची मजबूत पकड, संघटना टिकवण्याचे उद्धव, आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान

ठाणे; दिलीप शिंदे :  नेता कुणीही असो कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर गेली 30 वर्षे ठाणे, कल्याणसह ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकत राहिला आहे. ठाकरे कुटुंबीयांना नेहमीच साथ देणार्‍या ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ठाणे जिल्ह्यातील शिवसेना ही आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटनेचे पदाधिकारी-जुने कट्टर शिवसैनिक अशी विभागली गेली. संपूर्ण ठाणे हे शिंदे यांच्यासोबत उभा राहील, असे वाटत असताना आनंद दिघे यांचे दुसरे शिष्य ठाण्याचे खासदार राजन विचारे हे काही जिल्हा प्रमुख, जुन्या निष्ठावान शिवसैनिकांसह मातोश्रींसोबत उभे राहिले आहेत. मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्यात युवा नेते आदित्य ठाकरे हे ठाण मांडून बसले तरच उरली सुरली शिवसेना टिकून राहू शकेल; अन्यथा भाजपच्या मदतीने ठाणे जिल्ह्यावर शिंदेशाहीचा शिक्‍कामोर्तब होण्यास कुणी अडवू शकणार नाही.

ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणे असे समीकरण बनलेल्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांच्यामुळे बंड होईल, त्यांना आवरा, असे उघडपणे सांगत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सावध केले होते. हा इशारा त्यांनी 2014 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधानसभेचा अर्ज दाखल करताना दिला होता. तसे तरे हे मातोश्रीच्या जवळचे होते. अखेर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर तरे यांचे शिंदे विरोधातील बंड शमले होते. शिवसेनेतील अशाप्रकारच्या गटबाजीचा विस्फोट होऊन अखेर एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह महाविकास आघाडी विरोधात बंड करून ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा झेंडा पुढे नेण्यासाठी हा उठाव असल्याचे ठणकावून सांगणार्‍या मुख्यमंत्री शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून जोरदार समर्थन मिळू लागले आहे. आमदार प्रताप सरनाईक, विश्‍वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे आणि अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के हे ठामपणे शिंदे यांच्या बंडात सक्रिय झाले. परिणामी कल्याण, उल्हासनगर येथील निषेधाच्या दोन घटनांचा अपवाद वगळता ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या विरोधात कुणी रस्त्यावर आले नाही की कुणी उघडपणे विरोध केला, त्यातून शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर किती पकड मजबूत आहे, हे स्पष्ट होते.

शिंदे यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार्‍या ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवक आणि ठाणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा पुष्पा बोराडे यांनी शिंदे गटात सामील होऊन ठाकरे यांना धक्‍का दिला आहे. ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा भाईंदर महापालिकांमधील आजी- माजी नगरसेवक तसेच शहापूर, मुरबाड येथील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत सभापती हे शिंदे गटात सामील झाले आहेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बंड शमविण्यासाठी सक्रिय असलेले रवींद्र फाटक यांच्यानंतर दिघे यांचे शिष्य, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी देखील शिंदे गटाचा भगवा हाती घेऊन कल्याणला खिंडार पाडले आहे.

शिवसेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी ठाकरे पिता-पुत्र आणि शिवसेना नेते हे राज्यात निष्ठावंतांचे मेळावे घेत आहेत; मात्र अद्याप ठाण्यात कुणी फिरकले नाहीत. एवढी शिवसेना कमजोर झालेली आहे. त्यामुळे स्वतः ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे काम ठप्प झालेले आहे. तब्बल 350 शाखांची कामेही थंडावली असून कुठल्या गटाचे कोण यावरून संशयकल्लोळ सुरू आहे. निष्ठावान शिवसैनिक आणि शिंदे गटाचे शिवसैनिक असे दोन गट बनले असले तरी ‘कुणाचा झेंडा घेऊ हाती’, अशी शिवसैनिकांची अवस्था झालेली आहे. अशा प्रचंड दबावाच्या परिस्थितीत खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार मेंडोन्सा यांच्या जोडीला जुन्या पदाधिकार्‍यांना सक्रिय करण्याचे काम ठाकरे यांनी सुरू केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 18 आमदारांपैकी शिवसेनेचे पाच, एक अपक्ष, एक मनसे आणि आठ भाजपचे आमदार हे शिंदे- फडणवीस गटासोबत आहेत. उर्वरित राष्ट्रवादीचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक असे तीन आमदार हे महाविकास आघाडीसोबत आहेत. काँग्रेसचा एकही आमदार जिल्ह्यात नसून केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे भाजपचे आहेत.
भाजपसोबत शिंदे गटाने आगामी महापालिका निवडणूक लढविल्यास नवी मुंबईत पुन्हा भाजपचे गणेश नाईक यांचे वर्चस्व अबाधित राहील आणि ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे युतीचा झेंडा फडकण्यास फारशी अडचण नाही. दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी करून निवडणूक लढविल्यास तिन्ही पक्षांना संजीवनी मिळू शकेल, कारण सध्या शांत दिसणारा निष्ठावान शिवसैनिक हा आतून दुखावलेला आहे.

राजन विचारे सेनेसोबत
शिंदे यांना आव्हान देण्याचे धाडस कुणी करेल, असे वाटत नसताना ठाण्याचे खासदार राजन विचारे, माजी आमदार सुभाष भोईर, कल्याण ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी आमदार गिल्बट मेंडोन्सा, नवी मुंबईचे विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर हे ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिले आहेत. शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही वजनदार नेते असल्याने अनेक पदाधिकारी हे तटस्थ राहिल्याचेही दिसून येतात. काही पदाधिकार्‍यांना प्रसाद मिळाला की यांची निष्ठा बदलताना दिसत आहे.

Back to top button