ठाणे : खानिवडे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडली टोलवसुली | पुढारी

ठाणे : खानिवडे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद पाडली टोलवसुली

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा : महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. मात्र खड्डे न बुजवता व कोणत्याही सुविधा न पुरवता टोल वसुली सुरूच आहे, याच्या निषेधार्थ वसई काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने आज (दि.१८) खानिवडे टोलनाका बंद करण्यात आला. अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँगेसच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले.

यावेळी वर्तक म्हणाले की, रविवारी आम्ही टोल नाक्यावर येऊन महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले होते. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. हे टोल वसुली शिवाय काहीही करण्यास तयार नाहीत. त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना फाटक उघडेच ठेवायला भाग पाडून वाहनांना टोल शिवाय जाऊ दिले. तर तातडीने दुरुस्ती न केल्यास यापुढे टोल वसुली बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे १० ते १५ मिनिटे टोल वसुली बंद पाडली होती. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button