बदलापूर-पाईपलाईन रोडवर बसखाली सापडून दुचाकीस्वार ठार | पुढारी

बदलापूर-पाईपलाईन रोडवर बसखाली सापडून दुचाकीस्वार ठार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावाजवळ बसखाली सापडून दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी कल्याण-शिळफाटा रस्त्या लगतच्या काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावाजवळील म्हाडा गृहनिर्माण वसाहतीसमोर ही दुर्घटना घडली. अंकित रामकुमार थैवा (वय २६, रा. आनंदनगर परिसर, गुड मॉर्निंग सोसायटी, अंबरनाथ) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. त्‍याचे वडील रामकुमार थैवा यांनी बस चालका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांली दिलेल्‍या माहितीनुसार, अंकित आपल्‍या दुचाकीवरुन ( एम एच 05/ई डी/ 8225) घणसोली येथे नोकरसाठी जात होता. केडीएमसीच्या परिवहनची ( एम एच 05/आर/1104 ) क्रमांकाची कल्याण ते पनवेल बस काटई-बदलापूर रस्त्याने खोणी-तळोजा मार्गे पनवेल येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता जात होती. खोणी रस्त्यावरून जात असताना चालक खड्डे चुकवित बस चालवत होता. म्हाडा वसाहतीसमोरून ही बस जात असताना या बसच्या उजव्या बाजूने स्कूटरवरून अंकित समांतर जात होता. म्हाडा वसाहतीसमोर अंकित रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात जोराने स्कूटरसह आदळला.  तोल जाऊन तो स्कूटरसह केडीएमटी बसच्या मागील बाजूला येऊन आदळला. स्कूटर बाजूला फेकली गेली. त्यामुळे अंकित बसच्या मागील टायरखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

बसच्या पाठीमागील बाजूला आवाज झाल्याने चालकाने दर्शक आरशातून पाहिले तेव्हा त्याला एक स्कूटरस्वार पडल्याचे दिसले. चालकाने पुढे जाऊन बस थांबविली. त्यावेळी त्याच्या खड्ड्यातून उडालेली स्कूटर बसवर आदळली असल्याचे दिसले. बस चालकाने ही माहिती केडीएमटीच्या परिवहन महाव्यवस्थापकांसह सहाय्यक परिवहन व्यवस्थापकांना  दिली. भोसले यांनी तातडीने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली.

कल्याण-डोंबिवलीतील चौथी दुर्घटना 

कल्याण-डोंबिवली परिसरातील महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. संबंधित प्राधिकरणांकडून पावसाळ्याआधीच खड्डे बुजवले नसल्याने प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

जुलै महिन्यात कल्याण-मुरबाड रस्त्यावरील म्हारळ गावाजवळील खड्ड्यांमध्ये दुचाकीसह आदळून नारायण भोईर या दूध विक्रेत्याचा मृत्यू झाला हाेता. कल्याण पश्चिमेतील टिळकचौक, सिध्देश्वर आळीत राहणारे सनदी लेखापाल रवींद्र पै, गणेश सहस्त्रबुध्दे या ज्येष्ठ नागरिकांचा टिळक चौकातील खड्डयात पाय मुरगळून ते जमिनीवर आदळले. या दोघांच्या हाताला गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शासनाने तीन वर्षापूर्वी घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका पादचारी, वाहन चालकांना बसत आहे.

 

हेही वाचा 

Back to top button