ठाणे : परिवहन समिती निवडणुकीला आयुक्तांची स्थगिती | पुढारी

ठाणे : परिवहन समिती निवडणुकीला आयुक्तांची स्थगिती

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन समितीतील 6 सदस्यांची मुदत सप्टेंबर 2021 रोजी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी नवीन सदस्यांच्या निवडीसाठी नुकतीच निवडणूक जाहिर करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या सत्ता स्थापनेची मुदत 27 ऑगस्ट रोजी संपुष्टात येत असल्याने सुरू झालेल्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेमुळे आयुक्त दिलीप ढोले यांनी समितीच्या निवडणूकीलाच स्थगिती दिली आहे. त्यावरील अभिप्रायासाठी त्यांनी राज्य शासनाला 5 जूलै रोजी पत्रव्यवहार केला आहे.

पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तब्बल 12 वर्षानंतर 2019 मध्ये दुसरी परिवहन समिती स्थापन करण्यात आली. या समितीतील 12 सदस्यांमध्ये भाजपचे 8, शिवसेनेचे 3 व काँग्रेसचे प्रत्येकी 1 सदस्यांचा समावेश आहे. या सर्व सदस्यांची समितीत निवड करताना वाहनांच्या वर्कशॉपमध्ये काम केल्याचा अनुभव अनिवार्य करण्यात आला होता. या सर्व सदस्यांनी अनुभवाची कागदपत्रे पालिकेला सादर केल्यानंतर त्यांची समितीत निवड करण्यात आली. मात्र यातील बहुतांशी सदस्यांनी अनुभवाची बोगस कागदपत्रे सादर केल्याची तक्रार पालिकेसह पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यावर ठोस निर्णय न झाल्याने समितीचे कार्य सुरूच ठेवण्यात आले.

या समितीतील 6 सदस्यांची मुदत सप्टेंबर 2021 मध्ये संपुष्टात आली होती. मात्र एकुण सदस्यांमधील कोणते सदस्य समितीतून बाहेर पडणार त्याची निश्चिती होत नव्हती. अखेर तीन महिन्यांनंतर जानेवारी 2022 मध्ये सर्व सदस्यांच्या चिठ्या तयार करुन त्यातील सोडतीनुसार परिवहन सभापती तथा भाजपचे सदस्य दिलीप जैन, वनिता बने, अविनाश जागुष्टे, देवीप्रसाद उपाध्याय, थॉमस ग्रेसियस व शिवसेनेचे राजेश म्हात्रे या 6 जणांची मुदत संपुष्टात आल्याचे जाहिर करण्यात आले. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी गेली 6 महिने निवडणूकच जाहिर करण्यात आली नाही. परिणामी नवीन सदस्यांची निवड रेंगाळल्यानंतर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रीया सुरू झाली.

Back to top button