मिरा-भाईंदरमधील नागरिक पक्षाघाताबाबत अनभिज्ञ | पुढारी

मिरा-भाईंदरमधील नागरिक पक्षाघाताबाबत अनभिज्ञ

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा : मिरा-भाईंदरमधील एका खासगी रुग्णालयाने केलेल्या ऑनलाईन स्ट्रोक (पक्षाघात) सर्वेक्षणात 200 नागरिकांमध्ये तब्बल 61 टक्के लोकांना स्ट्रोकची लक्षणेच माहीत नसल्याची बाब समोर आली आहे. संतुलन गमावणे, द़ृष्टी धुसर होणे किंवा कमी होणे, हात कमजोर होणे, बोलण्यात अडचणी यांसारखी प्राथमिक लक्षणेही त्यांना माहिती नसल्याचे उघड झाले आहे.

सामान्य लोकांमध्ये स्ट्रोकबाबत जागरूकतेचा अभाव आहे. एखाद्याला स्ट्रोकचा झटका आल्यास त्याच्यावर गोल्डन अवर्समध्ये उपचार केल्यास जीव वाचू शकतो. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा त्यातील अडथळ्यामुळे स्ट्रोक होतो. स्ट्रोक कोणालाही कधीही येऊ शकतो. या जीवघेण्या स्थितीबाबत लोकांमध्ये अत्यंत कमी जागरूकता आहे. स्ट्रोक सर्वेक्षणात 64.4 टक्के लोक विंडो पिरियड दरम्यान स्ट्रोकच्या उपचारांबद्दल जागरुक असले तरी सुमारे 61 टक्के लोकांना स्ट्रोकचा इशारा देणारी चिन्हे माहीत नाहीत. ज्यांना लक्षणे दिसून येतात त्यांना रुग्णालयात नेणे आवश्यक असते. 64.4 टक्के लोकांना हे माहीत आहे की जर रुग्णाला रुग्णालयात नेले तर त्याचे व्यवस्थापन केले जात असल्याचे लक्षात येऊ लागल्याने लोकांना आरोग्याचे महत्त्व कळू लागले आहे. 95.2 टक्के लोकांना वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली पाहिजे, असे वाटते तर सुमारे 82.7 टक्के लोकं दरवर्षी नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करून घेत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. स्ट्रोकबाबत वेळीच खबरदारी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करणे हितावह ठरते.

स्ट्रोकची लक्षणे…

मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्स काही मिनिटांनंतर रक्त किंवा ऑक्सिजनशिवाय अकार्यक्षम ठरतात आणि मेंदूची कार्यक्षमता नष्ट होते. स्ट्रोक एखाद्या व्यक्तीच्या हालचाली, बोलणे, खाणे, विचार करणे, लक्षात ठेवणे आणि शरीराच्या इतर महत्त्वपूर्ण कार्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.

Back to top button