डोंबिवली : वेदांतच्या मृत्यूस कारणीभूत बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल | पुढारी

डोंबिवली : वेदांतच्या मृत्यूस कारणीभूत बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : लिफ्टसाठी बांधलेल्या हौदात साठलेल्या पाण्यात बुडून वेदांत हनुमंत जाधव या सहा वर्षीय बालकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर सार्‍या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या बिल्डरच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर कल्याणडोंबिवली हानगरपालिकेसह पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

या संदर्भात दुर्दैवी वेदांगचा काका सतीश वसंत जाधव (26) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आजदे गावातील समर्थ पुजा बिल्डिंगमध्ये राहणारा रूपेश दिलीप पाटील (39) या बिल्डरवर भादंवि कलम 304 (अ) अन्वये अर्थात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या बिल्डरने डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला असलेल्या सांगर्ली गावात सुमारे बारा वर्षांपूर्वी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता तळ + 7 मजली इमारत बांधली आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम अर्ध्यावर सोडून दिले. इमारतीच्या लिफ्टसाठीच्या बांधलेल्या खड्ड्यामध्ये पडून सहा वर्षीय वेदांत जाधव याचा मृत्यू झाला.

लवकरच इमारत पाडणार

ग्रामपंचायत काळातील बांधकामाला जबाबदार कोण : बिल्डरने सदर भूखंडावर उभारलेली ही बहुमजली इमारत ग्रामपंचायत काळातील आहे. ही इमारत उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. वास्तविक पाहता असे अनधिकृत बांधकाम एमआयडीसीने तेव्हाच काढून टाकायला हवे होते, असे 10 /ई प्रभागातही सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले. घडलेली ही घटना दुर्दैवी आहे. एमआयडीसीकडे पत्रव्यवहार करून सदर इमारतीच्या बांधकामावर पाडकामाची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button