एकनाथ शिंदे लवकरच भाजपात? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट | पुढारी

एकनाथ शिंदे लवकरच भाजपात? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

वसई ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना आपण लवकरच भाजपात घेणार आहोत, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी वसई दौर्‍यात केला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना यांच्या कुरघोडी सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणे मुंबई, कोकणच्या दौर्‍यावर आहेत. वसईत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळले असून लवकरच भाजपात येतील असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

मातोश्रीच्या आदेशाशिवाय त्यांना एकही सही करण्याचा आदेश नाही. त्यामुळे ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना पक्षात घेऊ आणि या सरकारचे विसर्जन करू असे सांगत राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दरम्यान राणेंच्या या मोठ्या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी गर्दी झाल्याने 19 गुन्हे दाखल झाले होते. तर शुक्रवारी 13 असे एकूण 32 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. हे सरकार राजकीय कुरघोडीने आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे,

मात्र त्याला आम्ही घाबरत नाही, असे सांगताना मुंबई, ठाणे, वसई, विरारचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन राणे यांनी केले.

मी ज्यांना शिवसेनेत आणले, तेच माझ्यावर टीका करतात

मी ज्यांना शिवसेनेत आणले, तेच माझ्यावर टीका करतात, कारण माझ्यावर टीका केली तर मंत्रीपद मिळते असे सांगत निलम गोर्‍हे यांचा समाचार घेतला. निलम गोर्‍हे यांना शिवसेनेत मीच आणले, त्यांच्या आमदारकीसाठी मीच प्रयत्न केले. आता त्यांची पक्षात फरपट होत आहे. त्याकडे त्यांनी पहावे. माझ्यावर त्यांनी बोलू नये, असा टोला लगावला.

मनसे भाजप युती झाल्यास मला आनंद होईल असे सांगत राष्ट्रवादीवर होणार्‍या जातीवाचक आरोपाबाबत राणे यांनी हा मुद्दा बरोबर असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचा मुद्दा मी तोडत नाही असे सांगत राज ठाकरे यांच्या वक्तव्याला राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन दिले आहे.

रोजगारनिर्मितीवर भर देणार

माझ्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम हे खाते आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. आपला देश जागतिक शक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मोठा टप्पा पुढे जात आहे. माझ्या खात्या मार्फतही लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग वाढावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकणातही नव्याने उद्योग आणले जातील, असे राणे यांनी सांगितले.

Back to top button