ठाणे : घोडबंदररोडवर दुचाकीस्वार खड्ड्यात आदळल्याने बसखाली चिरडला | पुढारी

ठाणे : घोडबंदररोडवर दुचाकीस्वार खड्ड्यात आदळल्याने बसखाली चिरडला

ठाणे/मिरा रोड; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे पडतात आणि साहजिक रस्त्याच्या कामात होणारा भ्रष्टाचार देखील उघडा पडतो. मात्र, या खड्ड्यांमुळे काही निष्पाप नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. अशी एक घटना ठाण्यात समोर आली. मंगळवारी दुपारी घोडबंदर रोडवर एका दुचाकीस्वाराची मोटारसायकल रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात आदळली. त्यानंतर मोटारसायकल खाली कोसळून दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मोहनिस अहमद इरफान खान (37) असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रस्ते आणि खड्डे हे समीकरण ठाण्यात नवीन नाही. त्यातल्यात पावसाळा सुरू झाला की ठाणेकरांना खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो. याच खड्ड्यांमुळे काही वेळा निष्पाप नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. ठाण्यात मंगळवारी पुन्हा या खड्डयांनी एका मोटारसायकल चालकाचा जीव घेतला. घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मंगळवारी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास काजूपाडा, घोडबंदर रोड येथे मोहनिस दुचाकीवरून ठाण्याकडून मुंबईकडे जात होता. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सदरचा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवर पडला व त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2673) च्या मागील चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही एसटी बस ठाणेकडून बोरिवलीला जात होती. या अपघाताची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच या खड्ड्यांमुळे वारंवार वाहतूककोंडीही होऊन, तासनतास नागरिकांना रस्त्यावर थांबावे लागते. या सार्‍या समस्या लक्षात घेऊन पोलीस व पालिका प्रशासनाने एक बैठक घेऊन यापुढे जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याचे आढळले, तर त्याची पडताळणी केली जाईल. यात तथ्यता आढळली तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. मात्र, हा निर्णय कागदावरच राहिला आहे.

खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी

ठाण्यात खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्यास चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस व पालिका अधिकार्‍यांनी दोन वर्षांपूर्वी बैठकीत दिला होता. ठाण्यातील रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. याच खड्ड्यांमुळे वारंवार किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात होत असल्याच्या घटना समोर येतात.

Back to top button