कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत ११४ मिलीमीटर पावसाची नोंद | पुढारी

कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत ११४ मिलीमीटर पावसाची नोंद

कल्याण-डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : जून महिन्यात प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जुन महिन्याची सर्व कसर भरून काढली आहे. दरम्यान ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली शहराला पावसाने कालपासून अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या २४ तासात ठाणे येथे १३३ मिलीमीटर तर कल्याण डोंबिवली शहरात ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी अभ्यासकांच्या सांगण्यानुसार धारण क्षेत्रात अजूनही पाऊस पोहचला नसून त्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. (Kalyan Dombivli Rain Update)

संपूर्ण जून महिना पावसाऐवजी घामाच्या धारा पुसण्यातच गेल्याने सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. नाही म्हणायला जून महिन्यात थोडे फार पावसाचे शिंतोडे पडले. परंतु त्याने वातावरणातील गर्मी कमी होण्याऐवजी त्यात आणखीनच भर पडली. परिणामी जुलै महिन्यात तरी पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. तर कालपासूनच कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाची आकडेवारी पाहता हा पाऊस कमी असला तरी येत्या काळात ही तूट भरून निघेल अशी आशा नागरिक करत आहेत. (Kalyan Dombivli Rain Update)

पुढील आठवडाभर समाधानकारक पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असला तरी अद्यापही धरणक्षेत्रात पाऊस पोहचला नाही. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट दूर होण्यासाठी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडणे गरजेचे आहे.
– अभिजित मोडक, हवामान तज्ज्ञ

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी

ठाणे – १३३ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४९६ मिलीमीटर)

कल्याण डोंबिवली – ११४ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३८३ मिलीमीटर)

मुरबाड – ३९ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस २९१ मिलीमीटर)

भिवंडी – ११५ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३९१ मिलीमीटर)

शहापूर – ६० मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३७२ मिलीमीटर)

उल्हासनगर – ९६ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४१२ मिलीमीटर)

अंबरनाथ – ९२ मिलीमीटर, (१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४३८ मिलीमीटर)

Back to top button