कल्याण-डोंबिवली पुन्हा तुंबली | पुढारी

कल्याण-डोंबिवली पुन्हा तुंबली

सापाड : पुढारी वृत्तसेवा :  दिवसभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतेक भागांत पाणी साचून तळे निर्माण झाले परिणामी वाहतुकीची कोंडी होणे, अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
कल्याण-डोंबिवली शहरात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पडणार्‍या पावसामुळे सर्वच कल्याणकरांची धांदल उडाली. शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवरही पावसाच्या पाण्याचे लोट वाहू लागले होते. विशेषत: शिवाजी चौक लक्ष्मी मार्केट बाजारपेठेत पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तर शहराच्या स्टेशन रोड, शिवाजी चौक, सहजानंद चौकसह लालचौकी बाजारपेठ, बैल बाजार परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले होते.

वाडेघर चौक येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गांधारी परिसरात रस्त्याच्या डाव्या लेनवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातच शहरातील अनेक भागांत सुरु असलेल्या विकासकामांमुळे सिमेंट कॉक्रिटचे रस्ते सुरू असल्यामुळे भर पावसात कल्याणात मोठी वाहतूककोंडी दिसून आली. पावसाने जोर धरल्यानंतर लगेचच शहरातील अनेक चौकांतील सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. परिणाम शहरात वाहतुकीचा बोजवारा उडला. पावसामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांची या वाहतूक कोंडीत भर पडली. कल्याणात मान्सून दाखल झाल्यानंतर आज सकाळी पासून शहरात जोरदार पाऊस झाला. कल्याणात 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नालेसफाईचा बोजवाराच

ठेकेदाराकडून नालेसफाईच्या नावाखाली शहराच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केल्यामुळे शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचून जागोजागी चिखलाचे तळे साचले गेले आहेत. हीच परिस्थिती पावसालाभर राहिली तर घरात राहणं धोक्याचे होऊल. त्यामुळे तात्काळ शहरातील लहान-मोठे नाले साफ करून पावसाचे पाण्याचा मार्ग मोकळा करून घ्यावा, अशी मागणी पीडित नागरिकांकडून करण्यात आली आहे.

रस्त्यांची उंची वाढली, पाणी थेट घरात

शहरातील रस्ते वारंवार दुरुस्तीमुळे रस्त्याची उंची वाढत गेली मात्र रस्त्याशेजारील घराची उंची कमी-कमी होत गेल्यामुळे सखल भागातील नागरिकांच्या घरांमध्ये चिखलाचे पाणी घुसून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने नालेसफाईची पोलखोल केली असल्यामुळे पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे नालेसफाईवर खर्च करण्यात आलेल्या करोडो रुपये पाण्यात गेल्याच्या चर्चांना पालिका वर्तुळात उधाण आले आहे.

दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले गेले. हे पाणी का साचले गेले याचा संपूर्ण आढावा घेऊन बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाशी समन्वय साधून हे चॉकअप काढले जातील. आणि यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
-घनश्याम नावांगुर (पालिका उपयुक्त)

पहिल्या पावसात ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अशा ठिकाणी तात्काळ आपत्कालीन यंत्रणा पाठवून त्या ठिकणावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. येणार्‍या पावसात कोठेही पाणी साचले जाऊन नागरिकांना त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष राहील. या साठी आयुक्तांच्या आदेशानुसार सर्वच प्रभागक्षेत्र अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहेत.
– किशोर ठाकूर (प्रभाग क्षेत्र अधिकारी)

Back to top button