मुरबाडमध्ये भातपेरणीला दिलासा | पुढारी

मुरबाडमध्ये भातपेरणीला दिलासा

मुरबाड : बाळासाहेब भालेराव :  मुरबाड तालुक्यातील म्हसा, टोकवडे, धसई, सरळगाव, शिवले या परिसरात गेले तीन ते चार दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांनी माळरानावर व शेतात पेरलेल्या भाताच्या रोपांना चांगला दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने दिल्या आहेत.

तालुक्यात गेली तीन ते चार दिवस सतत संततधार तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने संपूर्ण मुरबाड तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच 1 जून ते 4 जुलैपर्यंत पावसाची नोंद 253 मिमी झाली आहे. म्हणजेच मुरबाड तालुक्यात 44% इतकी नोंद झाल्याची माहिती मुरबाड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रसाद पाटील यांनी दिली आहे. पेरलेल्या भातालाही चांगला पावसाचा दिलासा मिळत आहे. यामुळे लवकरात लवकर असाच पाऊस राहिला तर मुरबाड तालुक्यातील शेतकरी भात भातलावणीला सुरुवात करतील असे चित्र दिसून येत आहे. मुरबाड तालुक्यात भात पेरणी क्षेत्र 1556 हेक्टर असून नागली पेरणी क्षेत्र 12.60 हेक्टर, वरी पेरणी क्षेत्र 8.87 हेक्टर, तुर, उडीद, मुग पेरणी क्षेत्र 336 हेक्टर, भाजीपाला पेरणी क्षेत्र 60 हेक्टर पेरणी झाली आहे.

झिनी तांदूळ संपुष्टात येणार

तालुक्यात झिनी प्रसिद्ध,झिनी भात सध्या तालुक्यात नष्ट होत चालला आहे. नारिवली, म्हसा चोवीसच्या परिसरात पूर्वी झिनी भाताची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात होती, मात्र शेतकर्‍यांचा कल नवीन जातीच्या भात बियाण्याकडे वाढल्याने ही झिनी भाताची जात आता संपुष्टात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Back to top button