शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महापालिका निवडणुका एकत्रित लढणार? | पुढारी

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महापालिका निवडणुका एकत्रित लढणार?

ठाणे : दिलीप शिंदे : राज्यात बंड होऊन शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून आखली जात होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचाच गट ही खरी शिवसेना असल्याचा दावा केल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना वाचविण्यावर भर देत आहेत. त्यांना साथ देण्याची भूमिका दोन्ही काँग्रेसने घेतल्याने ठाणे, मुंबईसह राज्यातील महापालिका, नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत जाण्याची चाचपणी सुरु केली आहे. स्थानिक पातळीवर त्यानुसार हालचाली सुरु झाल्या आहेत.

भाजपला रोखण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले आणि नव्या राजकीय समीकरणांना सुरवात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विधानसभा पोटनिवडणूक एकत्रित लढवून यश मिळविले. मात्र महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करू नये अशी भूमिका तिन्ही पक्षाने घेतली होती. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना कामाला लगावले. तीच री ओढत शिवसेनेने ठाणे, मुंबईत महाविकास आघाडी करू नये असे सांगत एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते. मंत्री, खासदार हे जाहीरपणे एकमेकांवर टीका करीत एकमेकांचे वाभाडे काढत होते. महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाहीत अशी ओरडत करीत सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले. ठाण्यात युती नको अशी शिवसेनेने आणि काँग्रेसने मुंबईत महाविकास आघाडी करायची नाही असे वारंवार सांगितले.

महिनाभरात अधिक बळकटी मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्व समीकरणे बदलली आहेत. शिवसेना कमजोर झाली आहे. शिंदे गट हा भाजपसोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने दोन्ही काँग्रेसने ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरे यांना ताकद द्यायची अशी भूमिका दोन्ही काँग्रेसने घेतल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांनी तशी बांधणी सुरु केली आहे. स्वबळाचा नारा सोडून तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढावे, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे, त्यास पुढील महिनाभरात अधिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

Back to top button