पावसामुळे कल्याणमध्ये दरड कोसळली | पुढारी

पावसामुळे कल्याणमध्ये दरड कोसळली

कल्याण : पुढारी वृत्तसेवा :  रविवार पासून पडणार्‍या मुसळधार पावसाने सोमवारीही आपला जोर कायम ठेवला आहे. सकाळपासून कोसळणार्‍या मूसळधार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमाननगर नजीकच्या टेकडीवरुन दरड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

टेकडीच्या पायथ्यापाशी असलेल्या बैठ्या घरांच्या जवळपास दरडीचे कोसळलेले मोठे दगड कोसळून पडले, मात्र सुदैवाने घटनेत घरांचे नुकसान व जीवित हानी टळली. महापालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी व आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्याला सुरुवात करीत टेकडीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

कल्याण पूर्वेतील पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या मागच्या बाजूला व दुसर्‍या बाजुने हनुमानगरला लागून ही टेकडीवजा छोटा डोंगराचा भाग आहे. सोमवारी दुपारपासून मुसळधार पावसाने अधिकच जोर धरल्याने सायंकाळच्या सुमारास या छोट्या टेकडीच्या दरडीचा काही भाग कोसळला. कोसळलेल्या दरडी बरोबर मोठे दगड खाली आले. या टेकडीच्या पायथ्यापाशी बैठी घरे असून सुदैवाने या घरांवर दरड कोसळली नाही. या घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली.
घटना घडलेल्या परिसरातील पाच कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या कुटुंबियांना राधा कृष्ण मंदिराच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवण पाण्याची व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती प्रभाग अधिकारी मुंबरकर यांनी दिली आहे.

Back to top button