मोखाडा-बोटोशीत मातेसह नवागत अर्भके बचावली | पुढारी

मोखाडा-बोटोशीत मातेसह नवागत अर्भके बचावली

खोडाळा : पुढारी वृत्तसेवा :  मोखाडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील अतिदुर्गम गावपाड्यांत रस्ते, आरोग्य सुविधांची मोठी आबाळ आहे. दरम्यान बोटोशी अतिदुर्गम गावात राहणारी सीता वसंत दिवे या 25 वर्षीय महिलेला प्रसुती वेदना होवू लागल्याने नातेवाईकांनी खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकाही बोलावण्यात आली. मात्र पाथर्डी पुलावरुन पुढे जाण्यासाठी निसरड्या रस्त्यावर रुग्णवाहिका घसरत नदीपात्रात जात असताना चालकाने जीवावर उदार होत खोडाळा आरोग्य केंद्र गाठल्याने मातेसह नवागत अर्भके बचावली.रुग्णवाहिकाचालक, परिचारिकेचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

रुग्णवाहिका चालक देविदास पेहरे, परिचारिका प्रभा भोये यांनी अक्षरशः अग्नी परीक्षा दिली. जुळ्या बालकांपैकी एक बालक प्रसूत झाले मात्र दुसरे अपत्य प्रसूत होण्यास अडचण निर्माण झाली. त्यावेळी येथील तुकाराम पवार व अन्य ग्रामस्थांनी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून येथील रुग्णवाहिका बोटोशी येथे बोलावली. वेळीच उपचार झाल्याने मातेसह जुळी बालके बचावल्याचे डॉ. पुष्पा मथुरे यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी बनवला रस्ता…
बोटोशी येथील मातेला प्रसूतीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचवणे रस्त्याअभावी केवळ दुरापास्त होते. मात्र पाथर्डी आणि बोटोशी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानातून रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून रुग्णवाहिकेला सोयीचा मार्ग बनवून दिल्याने मातेसह दोन्हीही जुळी अर्भके सुखरूप असल्यामुळे ग्रामस्थांची मदत जीवनदायी ठरली आहे.

बोटोशी रस्त्याचा प्रश्न चर्चेत
पाथर्डी पासून पुढे बोटोशी गावठाण ते कुर्लोद दरम्यान 1 किलोमीटर रस्ता हा वन विभागाच्या अंतर्गत येतो त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.अनुसूचित जमाती व इतर वन निवासी कायद्या अंतर्गत अधिनियम 2006 व 2008 च्या कलम 3(2) नुसार बोटोशी ग्रामपंचायतीने मंजुरीसाठी प्रस्ताव वन विभागाच्या उप विभागीय कार्यालयाकडे सादर केला आहे. परंतु काही त्रुटींमुळे सदर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वन विभागाने आदिवासी बांधवांच्या जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन आदिवासीचा मार्ग सुकर करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button