ठाणे : जिल्ह्यावर पाणीकपातीचे सावट | पुढारी

ठाणे : जिल्ह्यावर पाणीकपातीचे सावट

बदलापूरः पुढारी वृत्तसेवा
यंदा पावसाने सुरुवातीलाच ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणातील पाण्याची पातळी खालावंत चालली आहे. सध्या बारवी धरणात अवघा 31 टक्केच पाणीसाठा असून पावसाने जोर न पकडल्यास ठाणे जिल्ह्याला पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा पावसाला वेळेत सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यंदा ठाणे जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जुन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 400 मिमी पावसाची नोंद होत असते. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यात 666.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या 165.5 टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीसाठी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात 27 जूनपर्यंत अवघ्या 32.3 टक्के पावसाची नोंद झाली असून अवघा 129.4 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पावसाने सरासरी गाठली नाही तर जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मिरा भाईंदर आणि ग्रामीण भाग तसेच औद्योगिक वसाहतींनाबारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तर आंध्र धरणातून आणि भिवपूर विद्युत प्रकल्पातून येणार्‍या पाण्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी राखली जाते. मात्र कमी पावसामुळे सध्याच्या घडीला जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठी नसल्याचे समोर आले आहे. बारवी धरणाची पाणी क्षमता 338.84 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्याच्या घडीला बारवी धरणात 107.79 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
एकूण क्षमतेच्या हे प्रमाण अवघे 31.36 टक्के इतके आहे. गेल्या वर्षात हाच पाणीसाठा 38.38 टक्के इतका म्हणजे 131.73 दशलक्ष घनमीटर इतका होता. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Back to top button