ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा | पुढारी

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वात आधी आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देणारे म्हस्के हे पहिले जिल्हाप्रमुख आहेत. ठाण्यातील जवळपास सर्वच नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा असून शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शक्ती प्रदर्शन देखील दर्शवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दर्शवले होते. शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक बॅनर्स देखील ठाण्यात लागले होते. त्यानंतर म्हस्के यांनी देखील फेसबुक वर पोस्ट टाकून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरोधात एकनाथ शिंदे यांचा असा संघर्ष निर्माण झाल्याने शिंदे यांच्या निवासस्थानी देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर शनिवारी (दि.२५) उशिरा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असल्याने ठाण्यातही वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

म्हस्के यांनी आपल्या राजीनामा पत्रात जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना असून आम्ही शिवसैनिकच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अडीज वर्षात राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे नंतर नरेश म्हस्के यांना शिवसेनेत महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादीशी युती न करता एकटे निवडणूक लढवण्याची भूमिका सुरुवातीपासूनच म्हस्के यांची होती. त्यामुळे आता म्हस्के यांच्या राजीनाम्याने ठाण्यात वातावरण आणखी तापले आहे.

Back to top button