ठाणे : धावत्या रेल्वेत स्टंटबाजी...जखमी तरुणावर गुन्हा | पुढारी

ठाणे : धावत्या रेल्वेत स्टंटबाजी...जखमी तरुणावर गुन्हा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; धावत्या लोकलच्या बंद बॅटरी रुमच्या दरवाजाच्या निमुळत्या जागेत लटकून स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या अंगाशी आले. प्रवासादरम्यान पाय सटकल्याने सदर तरुण धावत्या रेल्वेतून पडला. या घटनेचा व्हिडीओ दिवसभर वायरल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्गचे पोनि पंढरी कांदे यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

कळवा परिसरात राहणारा 18 वर्षीय दानिश खान हा चिंचपोकळी येथे कामासाठी जात होता. सकाळ 10 च्या सुमारास गर्दी असल्याने दानिश व त्याचा आतेभाऊ बंद बॅटरी रूमच्या दरवाजाच्या निमुळत्या जागेत लटकून प्रवास करत होते. कळवा स्थानक सोडताच 35/14 किलोमीटर अंतरावर पाय सटकल्याने तो धावत्या रेल्वेतून पडला. दरम्यान, ठाणे स्थानकात उतरून दानिशच्या आतेभावाने अपघातस्थळ गाठले व एका प्रवाशाच्या मदतीने त्याला कळवा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात त्याचा डावा हात फॅक्‍चर झाला आहे.

स्टंटबाजीचा व्हिडीओ वायरल

या अपघाताचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर वायरल झाला. या व्हिडीओबाबत लोहमार्ग पोलिसांना दुपारपर्यंत माहीत नव्हते. दरम्यान ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणयाचे पोनि पंढरी कांदे यांनी व्हिडीओतील काही ठिकाणाचे विश्‍लेषण करून अखेर अपघातस्थळ गाठले. सदर अपघाताबाबत चौकशी करत असताना दानिशवर कळवा रुग्णालयात उपचार असल्याचे समजले, अशी माहिती पोनि कांदे यांनी दिली.

Back to top button