पालघरमध्ये मालमत्तांच्या करात होणार भरीव वाढ | पुढारी

पालघरमध्ये मालमत्तांच्या करात होणार भरीव वाढ

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालघर नगर परिषद क्षेत्रातील सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाचा उपक्रम
हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम दर 4 वर्षांनी घेणे अपेक्षित असते. मात्र, या उपक्रमाला उशीर झाल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे.

मालमत्तांच्या पुनर्मुल्यांकनामुळे पालघर नगर परिषदेच्या मालमत्ता करामध्ये वाढ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पालघर नगर परिषदेत नव्याने बांधल्या जाणार्या इमारती, घरे व इतर मालमत्ता यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या पार्श्‍वभूमीवर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. 2008-2009 मध्ये शेवटचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर उशिरा नगरपरिषदेला जाग आली आणि पुनर्मूल्यांकनाचा घाट घातला आहे. यासाठी नगरपरिषदेने त्रयस्थ संस्था नेमली असून या संस्थेमार्फत मूल्यांकनाचे काम व त्याची माहिती गोळा करून नगरपरिषदेला दिली जाणार आहे. पुनर्मूल्यांकनाच्या पहिल्या टप्प्यात मालमत्तांना प्रभागनिहाय क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर या मालमत्तेचे मूल्यांकन व मोजमाप केले जाईल. मोजमापमध्ये अस्तित्वातील मालमत्ताचे आधीपेक्षा जास्त क्षेत्रफळ आढळल्यास त्यावर अतिरिक्त घरपट्टी कर आकारणी केला जाणार आहे. वाणिज्य, रहिवास व औद्योगिक या तिन्ही प्रकारच्या मालमत्तासाठी हा कार्यक्रम घेतला जात आहे. तिन्ही प्रकारच्या मालमत्तामार्फत पालघर नगरपरिषदेला वार्षिक सहा कोटीहून अधिकचा मालमत्ता कर प्राप्त होतो. पुनर्मूल्यांकनानंतर हा कर दुप्पट होईल, असा विश्वास नगरपालिकेच्या कर निर्धारण विभागाने व्यक्त केला आहे.

रहिवासी मालमत्ता कराचे दर
(प्रति स्क्‍वे. फूट)
अ झोन 1 रु. 20 पैसे
ब झोन 1 रु.
क झोन 80 पैसे
ड झोन 60 पैसे
वाणिज्य 2 रु.
औद्योगिक 1 रु. 50 पैसे

पुनर्मूल्यांकनंतर अतिरिक्त क्षेत्रफळावर आकारला जाणारा कर
रहिवासी 2 रु.40 पैसे
वाणिज्य 4 रु
औद्योगिक 3 रु

मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन सुरू असताना त्यासाठी नेमलेल्या कोलब्रो ग्रुप या संस्थेचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांना सदनिका, घर, इमारत किंवा इतर प्रकारच्या मालमत्तांची कागदपत्रे,नकाशे दाखवणे आवश्यक आहे. कागदपत्रे व प्रत्यक्ष मोजमापमध्ये फरक किंवा तफावत आढळल्यास अतिरिक्त क्षेत्रफळावर कर आकारणी केली जाणार आहे.

Back to top button