डोंबिवली : पीडित मुलीला मदत करणाऱ्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की | पुढारी

डोंबिवली : पीडित मुलीला मदत करणाऱ्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण कोळसेवाडी येथे झालेल्या मुलीच्या अत्याचार प्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला होता. मात्र, त्यानंतर त्या त्यांच्या परिवारासह एका हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेलेल्या असताना त्यांना सुरुवातीला शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या पतीला मारहाणदेखील केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक तपास पोलीस करत आहेत.

गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने या मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक गोष्टी मुलीने फोनमध्ये नोंद करून ठेवल्याच्या समोर आल्या होत्या. अत्याचार करणाऱ्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या काही मुलांचा सहभाग होता. त्या अनुषंगाने फिर्यादी असणाऱ्या महिला पदाधिकारी रसाळ यांनी समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमधून आवाज उठविला होता. त्यानंतर १८ जून रोजी रात्री त्या त्यांच्या पतीसमवेत बापगाव जवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्या होत्या.

हॉटेलमध्ये जागा नसल्याने त्या हॉटेल आवारात थांबल्या. याचवेळी त्यांचे पती हॉटेलमध्ये जागा उपलब्ध होत आहे का बघण्यासाठी गेले होते. मात्र रसाळ या एकट्याच उभ्या असल्याचे पाहून टेबलवर बसलेल्या काही मंडळींनी तू रसाळ ना सध्या कोळसेवाडी मुलीच्या प्रकरणात जास्तच पुढे पुढे करतेस असे धमकवण्यास आणि शिव्या देण्यास सुरुवात केली.

याचवेळी रसाळ यांचे पती तेथे पोहोचले असता त्यांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मी नरेंद्र पवार यांचा भाऊ आहे असे सांगत दादागिरी करत होत. मंडळींना चकवा देण्यासाठी रसाळ यांनी हॉटेलातून काढता पाय घेतला. त्यानंतर रसाळ ज्या रिक्षेत बसलेल्या त्या रिक्षाचादेखील मागोवा या मंडळींनी घेतला. मात्र रसाळ त्यांच्या पतीसह सुखरूप घरी पोहोचल्या, असे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी रुक्मिणीबाई रुग्णालयातून मेडिकल रिपोर्ट घेत रसाळ पती-पत्नी यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पोलिस शोध घेत असून हा प्रकार पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पडघा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिलेल्या तक्रारीनुसार, माजी आमदार नरेंद्र पवार यांचा मी भाऊ असल्याचे आरोपीने म्हटले आहे. या संदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांना विचारले असता कोणत्याही महिलेला अशा पद्धतीने मारहाण करणे हे निषेधार्ह असून मी यासंदर्भात विरोध दर्शवत आहे. माझा भाऊ असला तरी देखील हे कृत्य बरोबर नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button