डोंबिवली : चोरी करणे बेतले जीवावर ; ड्रेनेज पाईपवरून घसरल्याने चोरट्याचा जागीच मृत्‍यू | पुढारी

डोंबिवली : चोरी करणे बेतले जीवावर ; ड्रेनेज पाईपवरून घसरल्याने चोरट्याचा जागीच मृत्‍यू

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली खंबाळपाडा येथील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बीएसयूपीच्या इमारतीत वायरिंग चोरी करण्यासाठी दोन तरुण गेले होते. चोर शिरल्याचे लक्षात येताच वॉचमनला इमारतीमध्ये गेला. यावेळी चाेरट्यांनी इमारतीच्या पाईपवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघे खाली पडले. यावेळी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण जखमी झाला. मोहम्मद सलिम भाटकर असे मृत तरुणाचे नाव असून तो सराईत चाेरटा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजनेअंतर्गत डोंबिवली व खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र, अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आलेला नाही. या इमारती भग्नावस्थेत उभ्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इमारतींना चोरट्यांनी  लक्ष्य केले आहे. या इमारतीचे दरवाजे, ग्रील चोरून नेले आहेत.

दरम्यान, या इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग चोरी करण्यासाठी अरफाह पिंजारी व मोहम्मद भाटकर हे  सोमवारी रात्रीच्या सुमारास गेले. हे दोघे इमारतीमध्ये शिरल्याचे वॉचमनच्या लक्षात आले. त्‍याने घटनास्थळी धाव घेतली असता दोघांनी घाबरून इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यात हात निसटल्याने  मोहम्मद भाटकर व पिंजारी दोघे खाली पडले. यामध्ये मोहम्मद भटकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पिंजारी जखमी झाला आहे.

या मोहम्मद भटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात याआधी गुन्हे  दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button