केतकी चितळे हिच्या मावशीच्या घरातून लॅपटॉप जप्त | पुढारी

केतकी चितळे हिच्या मावशीच्या घरातून लॅपटॉप जप्त

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या कळंबोली येथील मावशीच्या घरातून ठाणे पोलिसांनी सोमवारी दुपारी लॅपटॉप आणि अन्य एक मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांनी केतकीला सोबत नेले होते. त्यानंतर तिला पुन्हा ठाणे पोलीस ठाण्यात आणले. केतकीचा मोबाईल पोलिसांनी आधीच जप्त केला आहे.

जप्त केलेल्या लॅपटॉपमधून केतकी आपले फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान केतकीने कुणाच्या सांगण्यावरून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. केतकी चितळेविरोधात आतापर्यंत राज्यात 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरूळ, पुणे, पिंपरी-चिंचवड, देहू रोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, उस्मानाबाद, पारनेर येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. सोमवारी तिच्यावर नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा पवार यांच्या तक्रारीवरून,153-,500,501,505(2), अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

केतकीला समर्थन देणार्‍या किरण इनामदारवरही पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याने तिच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. मात्र त्याने अवघ्या काही तासांमध्ये ती डिलीट सुद्धा केली. या प्रकारामुळे पनवेलमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

केतकीला मिरगीचा त्रास

केतकी चितळे आपल्या पोस्टवर ठाम असून ही पोस्ट आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. असे तिने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. तसेच तिला मिरगीचाही त्रास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेची तीन पथके तसेच सायबर विभागाचे एक अशी चार पथके कार्यरत आहेत. सायबर सेलमार्फत तांत्रिक तपास करून नेमकी कोणत्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ही पोस्ट करण्यात आली याचा तपास केला जात आहे. तपासात आणखी कोणी आरोपी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पाोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

Back to top button