Buy Sword Online : ऑनलाईन मागवता येताहेत हजारो तलवारी | पुढारी

Buy Sword Online : ऑनलाईन मागवता येताहेत हजारो तलवारी

ठाणे ; नरेंद्र राठोड : ‘अपने जन्मदिवस पर तलवार से केक काटे और अपना स्टेटस उंचा करे’ हे वाक्य एका बड्या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या वेबसाईटवर (Buy Sword Online) आधी येते. तुमची इच्छा झालीच; तर तुम्ही अशा वेबसाईटवर एका क्‍लिकवर हवी तशी तलवार, गुप्‍ती, कुकरी यासारख्या घातक शस्त्रांची फक्‍त ऑर्डर द्या आणि ही शस्त्रे कुरिअरने तुमच्या घरी दिलेल्या वेळेत दाखल होतील.

राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये धुळे, जालना, नांदेड, औरंगाबाद आदी ठिकाणी कुरिअरने आलेल्या तलवारींचा मोठा साठा जप्‍त झाला. यातील आरोपींनी या तलवारी ऑनलाईनच मागवल्या होत्या. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तलवारी ऑनलाईन मिळत असल्याचे स्पष्ट होताच दै. ‘पुढारी’ने तलवारींच्या ऑनलाईन मार्केटचा धांडोळा घेतला.

गुगलवर फक्‍त ‘बाय सॉर्ड ऑनलाईन’ (Buy Sword Online) असे टाईप केले तरी तलवार विक्री करणार्‍या डझनभर वेबसाईटच्या जाहिराती झळकू लागतात. एकापासून तब्बल दहा ते वीस हजार इतक्या मोठ्या संख्येने तलवारी घरपोच देण्याची हमी या जाहिराती देतात. कपड्यांपासून चारचाकी गाड्यांपर्यंत ऑनलाईन सामान विक्री करणार्‍या एका वेबसाईटने तर आपल्या जाहिरातीत ‘अपने जन्मदिवस पर तलवार से केक काटे और अपना स्टेटस उंचा करे’ असे वाक्य वापरले आहे. काही होलसेल सामान विक्री करणार्‍या वेबसाईटवर तर निव्वळ एका नगापासून तब्बल दहा ते पंधरा हजार नगांपर्यंत तलवारी खरेदी करता येण्याची सोय असल्याचे म्हटले आहे.

निनजा तलवार, राजपुती तलवार, वेडिंग तलवार, भवानी तलवार, रॉयल फॅमिली तलवार, गोरखा कुकरी, नेपाली कुकरी, मिलिटरी कुकरी अशा असंख्य नावाने घातक शस्त्रांची ऑनलाईन विक्री खुलेआम केली जात आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन ऑर्डर करताना कुठलीही अधिकृत माहिती अथवा कायदेशीर परवान्याची गरज भासत नाही. आता ऑनलाईन उपलब्धच असल्याने मोठ्या प्रमाणात तलवारी कुरिअरने मागवण्याचे प्रकारही राज्यात वाढले आहेत.

भिवंडीतून वितरण

ऑनलाईन मागवण्यात येणार्‍या तलवारी, गुप्‍ती व कुकरी दिल्ली, डेहराडून, अमृतसर आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथून विक्री केल्या जातात. बहुतांश शस्त्र विक्री करणार्‍या कंपन्यांचे कार्यालय याच शहरांमध्ये असल्याचे दिसतेे. या कंपन्या त्यांच्या कारखान्यांमधून भिवंडीतील गोडाऊनमध्ये आपला माल पाठवतात. त्यानंतर ऑनलाईन ऑर्डरनुसार तलवारी पॅकिंग करून खरेदी करणार्‍यांच्या घरापर्यंत पार्सलच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात.

सध्या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा जमाना असल्याने कुठल्या पार्सलमध्ये कुठले सामान आहे हे कळत नाही तसेच पार्सलच्या आतमधील सामानाबाबत जाणून घेणे हे आमच्या अधिकारात नाही, असे विशाल नामक एका ऑनलाईन डिलिव्हरी बॉयने सांगितले.

Back to top button