फ्लेमिंगो : ठाणे खाडीत सव्वा लाख पंखवाले पाहुणे - पुढारी

फ्लेमिंगो : ठाणे खाडीत सव्वा लाख पंखवाले पाहुणे

ठाणे ; अनुपमा गुंडे : ठाणे खाडीतील ऐरोली परिसरातील अभयारण्यात यंदा सुमारे 1 लाख 35 हजार फ्लेमिंगो म्हणजे रोहित पक्षी वास्तव्यास आले आहेत. विशेष म्हणजे, या पंखवाल्या पाहुण्यांचे वर्तन व स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) संशोधकांनी महाराष्ट्रात प्रथमच सहा रोहित पक्ष्यांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) बसवली आहे.

वाढत्या शहरीकरणात लगतचे खाडीकिनारे, पाणथळींमधील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे यासाठी 2004 मध्ये ठाणे खाडीला महत्त्वाचे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तीन महानगरांच्या मध्यभागी असलेल्या या भागाला 6 ऑगस्ट 2015 च्या अधिसूचनेद्वारे ठाणे खाडी फ्लेमिंगो (रोहित) अभयारण्य घोषित करण्यात आले.

या खाडीत दरवर्षी गुजरातच्या कच्छ भागातून मोठ्या प्रमाणावर रोहित पक्षी येतात. त्यांच्यात ग्रेटर फ्लेमिंगो आणि लेसर फ्लेमिंगो अशा प्रजातींचा समावेश असतो. यंदा 54 हजार ‘थोरले’ रोहित आणि 81 हजार ‘धाकटे’ रोहित आले आहेत, असे बीएनएचएसचे उपसंचालक व या संशोधनाचे प्रमुख राहुल खोत यांनी दैनिक ‘पुढारी’ला सांगितले.

बीएनएचएस 2017 पासून रोहित व अन्य स्थलांतरित पक्ष्यांवर संशोधन करत आहे. रोहित पक्षी किती संख्येने येतात? त्यांचे खाद्य काय असते? त्यांची आवडती ठिकाणे कोणती आणि का? प्रदूषणाचा त्यांच्या जीवनावर कोणता परिणाम होतो? यंदा ग्रेटर फ्लेमिंगो पूर्वीपेक्षा जास्त संख्येने का आले? या आधी ते कुठे जात होते? याचा अभ्यास बीएनएचएस करत आहे. ठाणे खाडीत 1994 च्या दरम्यान काही हजार रोहित पक्षी यायचे; त्यांची संख्या आता लाखावर गेली आहे. शेवाळ, खाडीच्या गाळातील जीव-जंतू, छोटे प्राणी हे प्रमुख खाद्य मुबलक मिळते. त्याचप्रमाणे आपल्याकडे किनारपट्टी भागात तापमान जास्त असल्यामुळेही त्यांची संख्या वाढली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

लेसर फ्लेमिंगो फक्त खाडीच्या भागात, तर ग्रेटर फ्लेमिंगो गोड्या पाण्यातही वास्तव्य करतात. रोहित पक्ष्यांच्या आगमनाला सप्टेंबरपासून सुरुवात होते; ते एकगठ्ठा येतात, असे सांगितले जायचे. मात्र, हे पक्षी एकाच वेळी येत नाहीत. आपल्याकडे येणारे रोहित पक्षी गुजरातमधील हवामान, पाऊस-पाणी, तापमान पाहून इकडे स्थलांतर करतात. फ्लेमिंगो जानेवारीपासून आपल्या खाडीत दिसतात, मार्च-एप्रिलमध्ये त्यांच्या संख्येत वाढ होते आणि मे-जूनमध्ये ते परतीचा प्रवास सुरू करतात. लेसर फ्लेमिंगो सुरुवातील ठाण्याच्या बाजूला दिसतात, नंतर ते वाशीच्या दिशेने सरकतात, असेे गेल्या 4-5 वर्षांच्या निरीक्षणातून समजले आहे, अशी माहिती बीएनएचएसचे संचालक राहुल खोत यांनी दिली.

Back to top button