ठाणे : मुंब्र्याच्या व्यापार्‍याचे सहा कोटी लुटणार्‍या तीन अधिकार्‍यांसह 10 पोलीस निलंबित | पुढारी

ठाणे : मुंब्र्याच्या व्यापार्‍याचे सहा कोटी लुटणार्‍या तीन अधिकार्‍यांसह 10 पोलीस निलंबित

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरात सापडलेले प्रत्येकी एक कोटी ठेवलेले 30 बॉक्स जप्त केल्यानंतर त्यातील 6 बॉक्स हडप करणार्‍या 3 पोलीस अधिकार्‍यांसह 10 पोलीस निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी जारी केले आहेत.

निलंबित झालेल्यांमध्ये मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे, पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे, रवी मदने या तीन अधिकार्‍यांसह पंकज गायकर, जगदीश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन, निलेश साळुंखे या पोलिसांचा समावेश आहे.

फैजल यांच्या घरात 30 बॉक्समध्ये 30 कोटी दडवून ठेवल्याची माहिती मिळताच 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 च्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांनी पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे, रवी मदने या दोन अधिकार्‍यांसह इतर सात पोलिसांसह मेमन यांच्या घरी धाड टाकून नोटांचे बॉक्स जप्त केले. हे पैसे घेऊन मेमनसह पोलिसांचे पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात आले.

हा काळा पैसा आहे, त्यातील अर्धी रक्कम आम्हाला दे, अशी दमदाटी पोलिसांनी मेमन यांना केली. मेमन 2 कोटी रुपये देण्यास तयार झाले. आम्ही 2 कोटी काढून घेतो आणि उरलेले तुला परत करतो, असे सांगत प्रत्यक्षात 30 कोटींमधून 6 कोटी रुपये पोलिसांनी काढून घेतले आणि उरलेले 24 कोटी रुपये मेमन यांना परत केले.

एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लाथा मारून बाहेर काढले. तशी तक्रार पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांच्याकडे झाली आणि मुंब्य्रातील या लुटीला वाचा फुटली. पोलीस चौकशीत मुंब्रा पोलीस स्टेशनमधील 12 एप्रिलच्या मध्यरात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे कोट्यवधींचे लूट प्रकरण घडल्याचे स्पष्ट झाले.

मुंब्रा बॉम्बे कॉलनीतील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी आहेत. तसेच ते भागीदारीमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहेत. धाडीत त्यांच्या घरी पोलिसांना आढळलेल्या 30 कोटींपैकी 20 कोटी रुपये त्यांना चेकने आले होते. उर्वरित 10 कोटी अन्य मार्गाने आले होते असे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button