पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि रिव्हॉल्वर दाखवून महिलेस धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणात नाईक यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या हमीवर त्यांना आज (दि.४) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी बुधवारी ठाणे न्यायालयाचे न्या. एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी झाली. नाईक यांची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने तसेच गुन्ह्यातील रिव्हॉल्वर जप्त करायचे असल्याने त्यांना पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यावर नाईक डीएनए चाचणी करण्यास तयार आहेत. गुन्ह्यांतील रिव्हॉल्वरदेखील देण्यास तयार आहेत, असे नाईक यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणी २७ एप्रिलला एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती नाईक यांच्या वकिलांनी यापूर्वी न्यायालयात केली होती. ही सुनावणी ठाणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात होणार होती. मात्र, बुधवारी अचानक ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. दोन्ही बाजूने सुमारे साडेतीन तास युक्तिवाद करण्यात झाला होता.
हेही वाचलंत का ?