ठाणे : महापालिकेच्या वाढीव आकृतिबंधाला नगरविकास मंत्र्यांची मंजुरी | पुढारी

ठाणे : महापालिकेच्या वाढीव आकृतिबंधाला नगरविकास मंत्र्यांची मंजुरी

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिकेचा विस्‍तार वाढला आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने ठाणे महापालिकेच्या वाढीव आकृतिबंधाला मंजुरी दिली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेला आता नव्याने ८८० पदांची भरती करता येणार आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २०१२ च्या जनगणनेनुसार १८.४१ लाख इतकी होती. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नाही. परंतु, शहराची लोकसंख्या २४ लाख असावी, असा अंदाज आहे. या लोकसंख्येला मूलभूत सोयीसुविधा पुरवताना ठाणे महापालिका प्रशासनावर अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ताण येत आहे. त्यामुळे वाढीव पदांची भरती करण्यास मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला होता.

महापालिकेचा आस्थापना खर्च विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे. त्यातच गेली दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न  घटल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. परंतु, ठाणेकरांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विशेष बाब म्हणून या वाढीव आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. दरम्‍यान, ८८० वाढीव पदांची निर्मिती करण्यात आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Back to top button