दुबईत बिटकॉईनच्या चक्रव्युहात ९३० भारतीय | पुढारी

दुबईत बिटकॉईनच्या चक्रव्युहात ९३० भारतीय

ठाणे ; संतोष बिचकुले : प्रतिदिनी 2 हजार रुपये कमवा, बिटकॉईन मायनिंगमध्ये गुंतवणूक करा, असे आमिष दाखवून एका शिक्षकासह भारतातील 930 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दुबईतून सुरू असलेल्या या फसवणुकीच्या गुन्ह्याला माटुंगा पोलिसांनी वाचा फोडली असून, फसवणूक करणार्‍या टोळीतील तिसरी पास असलेल्या एका म्होरक्याला बंगळुरूमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या आरोपीच्या बँकेतून 71 लाखांहून अधिक रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासादरम्यान निष्पन्‍न झाले आहे. आरोपी मोहम्मद जबीर (31, रा. बिस्मिला नगर, बंगळुरू, कर्नाटक) याला मुंबईत आणल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे माटुंगा पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीत विषय शिकवणार्‍या शिक्षकाला बिटकॉईन मायनिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फोन आला होता. प्रतिदिन 2 हजार रुपये कमावण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले. या संधीला माटुंग्यातील एक शिक्षक बळी पडला.

फोनवरून बोलणार्‍या इसमाने शिक्षकाला व्हॉट्सअ‍ॅपवर लिंक पाठवली. सदर लिंकद्वारे शिक्षकाने आर्गो प्रो नावाचे अ‍ॅप डाऊ नलोड केले. त्यात 30 दिवसांपासून 6 महिने, 12 महिने व अन्य मर्यादेनुसार गुंतवणूक करण्याचे ऑपशन होते. सुरुवातीला शिक्षकाने थोडी रक्‍कम गुंतवली. त्यात नफा होत असल्याचे लक्षात येताच शिक्षकाने टप्प्याटप्प्याने 2 लाख 47 हजार 250 रुपये गुंतवले. दरम्यान आर्गो प्रो अ‍ॅपचे अपडेट व्हर्जन आले.

नव्याने आलेल्या आरो हॅश या व्हर्जनवरून शिक्षकाने गुुंतवणूक चालूच ठेवली. दरम्यान, 18 जानेवारी रोजी दोन्ही अ‍ॅप बंद झाले. तसेच गुंतवणुकीसाठी आलेला मोबाईल क्रमांकही बंद असल्याचे शिक्षकाच्या लक्षात आले. त्याने 20 जानेवारी रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण केले असता आरोपी बंगळुरूमध्ये असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानुसार उपायुक्‍त विजय पाटील, सपोआ नीता फडके, वपोनि दीपक चव्हाण, पोनि चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर प्रतिबंधक गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी पोउपनि डॉ. राजाभाऊ गरड, पोना संतोष पवार, अंमलदार मंगेश जर्‍हाड हे बंगळुरूमध्ये दाखल झाले आणि संवेदनशील परिसरात सापळा लावून आरोपी मोहम्मद जबीर याच्या मुसक्या आवळल्या.

अशी करत होते फसवणूक

1. प्रतिदिनी पैसे कमवण्याचे आमिष दाखवून फसवणुकीसाठी भारतीय मोबाईल नंबर्सचा वापर करण्यात आला आहे. सदर मोबाईल क्रमांकांचे दुबईत व्हॉटसअ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले होते. त्या क्रमांकांवरून व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामचा ग्रुप तयार करण्यात आला होता.

2. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 240 तर टेलिग्राम ग्रुपमध्ये 690 गुंतवणूकदारांना सहभागी करण्यात आले होते. अशा प्रकारे आरोपींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई, दिल्ली, राजस्थान, बंगळुरूसह अन्य राज्यातील 930 नागरिकांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उजेडात आले आहे.

3. या फसवणुकीच्या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असून, त्या रॅकेटचा एक म्होरक्या माटुंगा पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे बिटकॉईन मायनिंगच्या नावाखाली फसवणूक करणारे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता माटुंगा
पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

काय आहे बिटकॉईन माईनिंग?

बिटकॉईन ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असते. फक्त ते ऑनलाईन असते आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेले असते. जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसेच इथेही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते.

ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होत असते. सध्यातरी भारतात बिटकॉईन माईनिंगला मान्यता नाही.

Back to top button