बदलापूर पश्चिम भागाला पुराचा तडाखा, दुकानांमध्ये शिरले पाणी

बदलापूर; पंकज साताळकर : बदलापूर पश्चिम भागाला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. बदलापूर पश्चिमेकडील रमेश वाडी, हेंद्रेपाडा, मांजर्ली, बाजारपेठ, मोहनानंद परिसर, शनिनगर बदलापूर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या बारा तासांपासून या भागात जोरदार पाऊस पडत आहे.

येथील तळ मजले पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर उभी असलेली वाहने, दुकानांमध्ये रात्री पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
उल्हास नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ याला कारणीभूत ठरली आहे. पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाली आहेत. या बांधकामामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पश्चिम भागात पाणी पातळीत वाढ होत असल्याने या भागातील वीज पुरवठा रात्रीपासूनच पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे.
रात्री दीडच्या सुमारास उल्हास नदीने धोक्‍याची असलेली 17.50 मीटरची पातळी ओलांडल्यानंतर पश्चिम भागातील अनेक परिसरात पाणी पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

यामुळे पश्चिमेकडील बहुतांश परिसरात जलमय झाला आहे. अनेक नागरिक हे सुरक्षितस्थळी जात आहेत.

बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत रस्त्यावर उतरून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांना मदत करत आहेत.

मात्र, पश्चिम भागात दरवर्षी पूर येत असल्याने येथे राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत.

बदलापूर वांगणी रेल्वे मार्ग पाण्याखाली…

2019 साली बदलापूर येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस ज्या ठिकाणी पाण्याखाली गेली होती. त्याच ठिकाणी म्हणजेच बदलापूर-वांगणीच्या दरम्यान चामटोली येथे देखील उल्हास नदीचे पाणी रेल्वे रुळांवरून पलीकडे कल्याण कर्जत महामार्गावर आल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत.

तसेच या रुळाला लागून असलेला कल्याण कर्जत हा महामार्ग देखील पाण्याखाली गेला आहे. रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्येही बुधवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत आहे.

राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे येथे मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button