आई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री | पुढारी

आई-वडिलांनीच केली पोटच्या 3 मुलांची विक्री

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईत नेरूळ येथील जन्मदात्यांनीच आपल्या 3 मुलांची विक्री केल्याची धक्कादायक महिती महिला व बालविकास विभागाने उघडकीस आणली आहे. या बालकांना विकण्यासाठी आई-वडिलांनी 2 लाख 90 हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून, घटनेची कुणकुण लागताच पिता फरार झाला आहे. नेरूळ रेल्वेस्थानकातील फलाटावर राहणारी शारदा शेख (30) ही महिला गरोदर असून तिने प्रसूतीपूर्वीच आपल्या बाळाची 2 लाखांना विक्री केल्याची माहिती आमच्या कार्यालयाला दिली होती, असे ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दैनिक पुढारीला सांगितले.

शारदासोबत तिचा पती आयुब शेख राहतो, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी अ‍ॅड. पल्लवी जाधव, चाईल्ड लाईन संस्थेचे प्रतिनिधी विजय खरात, सरस्वती पागडे तसेच सामाजिक कार्यकर्ता गणेश शेळके हे या दाम्पत्यावर लक्ष ठेवून होते.

24 डिसेंबर रोजी शारदाला मुलगी झाली परंतू तिचे बाळ तिच्याकडे फक्त 15 दिवस होते. तिचे बाळ तिच्याकडे नसल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास येताच यंत्रणा अधिक सतर्क झाली. या सर्वेक्षणात आपल्याला एकही बाळ नसल्याची माहिती शारदाने दिली होती. परंतु नवजात बालकासह तिला आधीची 4 मुले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. सर्व खात्री करून 18 जानेवारी रोजी महिला व बालविकास समितीच्या आदेशानुसार नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये शारदाची तक्रार नोंदवण्यात आली.

90 हजारांत मुलगी विकली

सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवडेकर व त्यांच्या सहकार्‍यांसह शारदाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिवसभर चाललेल्या चौकशीत तिने आत्तापर्यंत तिची 3 मुले विकल्याचे उघड झाले. या जोडप्याने 2019 मध्ये आपली 3 महिन्यांची मुलगी नवी मुंबईतील एनआरआय परिसरात विकल्याची माहिती तपासात दिली.

त्यानुसार ही मुलगी खरेदी करणार्‍या महिलेचे घर गाठले व ही मुलगी ताब्यात घेण्यात आली. हा व्यवहार 90 हजार रुपयांना झाल्याचे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. बाळाची खरेदी व विक्री करणार्‍या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलीनंतरचा मुलगा शारदाने चर्चगेटला कुणाला तरी दिला असल्याचे ती सांगते.

Back to top button