

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी सोमवारी (दि.13 ऑक्टोबर) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला आहे, तर इतर दिग्गजांना पर्यायी मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ आणि जेऊर हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्या ठिकाणी माजी आ.सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना राजकीय धक्का बसला आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या काकू माजी जि.प.सदस्य मंगल कल्याणशेट्टी यांचे चप्पळगाव गट पुन्हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे यांचाही वागदरी गट ओबीसी खुला प्रवर्ग आरक्षित झाल्याने त्यांचाही झेडपीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे यांचा नान्नज गट ओबीसी खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांच्या गटात नाराजी दिसून आली. दारफळ बीबी आणि कोंडी दोन्ही गट सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने सुरेश हसापुरे यांना धक्का बसला आहे. हत्तुर गट सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख माजी जि.प.सदस्य अमर पाटील यांना धक्का बसला आहे. जि.प.चे माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांचा कुंभारी ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्यावर राजकीय गडांतर आले आहे. करमाळा तालुक्यातील सहापैकी पाचही गट महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुषांत निरुत्साह पाहायला मिळाला.
माजी आमदार तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचा कुर्डू हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला आहे. तर माजी आ.बबनदादादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा मानेगांव गट हा सवर्सधारण खुला प्रवर्गासाठी कायम राहिला आहे. मोहोळ तालुक्यात माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे आष्टी व नरखेड हे गट दुसऱ्यांदा खुले राहिले आहे.
माळशिरस तालुक्यातील स्वरुपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांचा बोरगांव गट हा अनुसूचित जाती खुला झाल्याने त्यांचींही कोंडी झाली आहे. यंदा अकलूज नगरपंचायत झाल्याने शितलदेवी धैर्यशील मोहिते -पाटील यांचा गट नगरपंचायतीत समाविष्ट झाला आहे. माळीनगर, बोरगांव, वेळापूर, दहिगांव चारही गट अनूसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महसूल उप जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षणाचे सोडत चिट्ठीद्वारे काढण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, अव्वल कारकून दीपक ठेंगील, मल्हारी नाईकनवरे, पुष्पवती साखरे, प्रताप काळे यांनी सहभाग घेतला.
यंदा सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुठल्या गटाला मिळणार याची आतापासूनच उत्सुकता लागली आहे. सलगर, महुद बु, दामाजीनगर, वळसंग, कासेगाव, नान्नज, उपळाई ठोंगे, वागदरी, पोखरापूर, संग्रामनगर, केम, निमगाव, कुंभारी उपळाई बु, एखतपूर, टेंभुर्णी, उपळाई दु., घेरडी हे गट ओबीसीसाठी आरक्षित आहेत. यातूनच जि.प. अध्यक्षांची निवड होणार आहे.