संजय पाठक
सोलापूर : तसे पाहिले तर सोलापूर जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवडीचा विषय. येथील गूळभेंडी ज्वारीचा हुरडा, शिककढाई मटण, शेंगाचटणी अन् कडक भाकरी हा शरद पवाराचा विक पॉईंट. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या व स्वतः पवारांच्या राजकारणाला वळण देणारे काही हक्काचे पॉकेटही याच जिल्ह्यात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर शरद पवारांची आजही करडी नजर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा राजकीय सारीपाट पूर्णपणे बदलून टाकण्याच्या तयारीला पवार लागल्याचे दिसून येत आहेत.
राज्यात पुण्याखालोखाल जर शरद पवारांना नेहमीच कोणत्या जिल्ह्याने साथ दिली असेल, तर तो आहे सोलापूर जिल्हा. परंतु, हल्ली हे समीकरण थोड्याफार फरकाने बदलू लागले होते. जिल्ह्यावर हळूहळू भाजपची पकड घट्ट होऊ लागली. राजकीय चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या पवारांच्या नजरेस ही गोष्ट आली नसेल, तर नवलच ना. त्यांनी आस्ते कदम वाटचाल करत काही काळ याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. परंतु, वाघ जसा दोन पावलं मागे जाऊन जोरात झेप घेत शिकार टिपतोच, अगदी तशीच भूमिका पवारांची सोलापूर जिल्ह्याबाबत आहे. कधी भाजप तर कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हक्काची, खास अशी नेतेमंडळी फोडून स्वतःकडे वळवून घेण्यात यश मिळवले. त्यावेळी पवारांनी अजिबात हालचाल न करता शांतपणे हे सारे पाहिले. आता मात्र अतिशय आक्रमक राजकीय हालचाली करत पवारांनी भाजपला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात ‘बॅकफूट’ला पाठवण्याचा जणू चंगच बांधल्याचे दिसून येऊ लागले आहे.
बहुचर्चित पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भाजपचे मातब्बर नेते, माजी आ. प्रशांत परिचारक यांनीही पक्षाविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. लगेचच त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांंच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या ‘तुतारी’च्या नावाने जल्लोष सुरू केला. अर्थात, अद्यापतरी परिचारक हे पवारांच्या भेटीला गेले नसल्याचे समजते. परंतु, पवारांची जिल्ह्यावर करडी नजर असल्याचे यावरून दिसते.
सांगोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आ. शहाजी पाटील यांच्याविरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आ. दीपक साळुंखे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी ‘तुतारी’हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. दुसर्या बाजूला याच तालुक्यातील ज्येष्ठ नेते (कै.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब हे देखील शेकापच्या चिन्हावर व शरद पवारांच्या मदतीने निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. या गोंधळात भाजप व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे चर्चेतही नाही.
मोहोळमध्ये देखील पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. या मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आ. यशवंत माने यांनी स्वतःहून पवारांशी जवळीक साधण्यास आरंभ केला आहे. त्यांनी नुकताच खा. सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून प्रवास केला. दुसर्या बाजूला त्याच मतदारसंघातून माजी आ. रमेश कदम यांनी देखील शरद पवारांच्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
बार्शीचे मातब्बर नेते, माजी आ. दिलीप सोपल आणि माजी आ. प्रभाताई झाडबुके यांची शरद पवारांनी भेट घेतली. यातच सारे आले. कारण हे दोन्ही तालुक्यातील ‘की पर्सन’ होत. यामुळे विधानसभा निवडणुकीप्रसंगी येथील परिस्थिती फार वेगळी नसेल हा संदेश जणू शरद पवार यांनी दिला.
अजित पवारांचे समर्थक, तब्बल सहावेळा निवडून आलेले आ. बबनदादा शिंदे हे मुलगा व सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवू इच्छित आहेत. नेमक्या त्याचवेळी आ. शिंदे यांचे बंधू रमेश व मुलगा धनराज यांना शरद पवारांनी भेटीची वेळ दिली. या भेटीत माढा मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचे धनराज यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आ. शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. यादरम्यानच, याच माढा मतदारसंघातून इच्छुक असलेले वजनदार नेते अभिजित पाटील यांनीदेखील पवारांशी संपर्क कायम ठेवत दावेदारी कायम ठेवली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव व भाजपचे विधान परिषद आ. रणजितसिंह हेही शरद पवारांच्या पक्षाच्या उंबरठ्यावर आहेत. ते स्वतः माढा मतदारसंघातून रिंगणात उतरू शकतील, अशी चर्चा आहे. आता यापुढील अंक काय असेल हे खुद्द शरद पवारच सांगू शकतील, अशी स्थिती आहे.